Block the way of farmers' association against onion export ban
--- कांदा उत्पादक शेतकरी संगठना आंदोलन करताना

  • शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्थानबद्ध
  • पोलिस बंदोबस्तात संघटनेचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन

अकोला (Akola). केंद्र सरकारने काल जाहीर केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने मंगळवारी राज्यात ठिकठिकाणी ”रास्ता रोको आंदोलन” केले. दरम्यान, पणज येथे रास्ता रोको आंदोलन करताना संघटनेचे नेते ललित बाहाळे यांच्यासोबत इतरही कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. यावेळी पोलिस बंदोबस्तात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी यांनी अकोट उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन सादर करीत निषेध नोंदविला.

यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते ललित पाटील बाहाळे यांनी केंद्र शासनाच्या आयात, निर्यात धोरणावर टीका करीत असताना विदेश व्यापार मंत्रालयाने औचित्याचा भंग केला असल्याचे सांगितले. विदेश व्यापार संतुलनासाठी आतापर्यंत कांदा निर्यातीने आपले करत्व पार पाडले. परंतु ज्या निर्यात वाढीसाठी या विभागाची स्थापना झाली आहे, त्याविरुद्ध हा विभाग काम करतो आहे, कोविड १९ मुळे जेथे परकीय चलनाची देशाला अत्यंत निकड आहे, अशाप्रसंगी कुठल्याही निर्यातीवर बंदी आणणे राष्ट्रीय हिताचे नाही. निर्यात वाढीकरिता स्थापना केलेले कार्यालय निर्यात कमी करण्याचे निर्णय घेत असेल तर ते तात्काळ बंद केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

अत्यावश्यक वस्तू कायदा, कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा आणि करार शेती संबंधी अध्यादेश काढून शेती मालाच्या किमतींवरील सरकारी नियंत्रण प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे कमी करण्यात आले होते. तसेच बीटी वांग्याची परवानगी दिल्याने नुकतेच शेतकरी संघटनेने या सरकारी निर्णयाचे स्वागत केले होते. कांदा निर्यात बंदी हा सरकारचे शेतमालासंबंधीचे धोरण अनिश्चित असल्याचे शेतकरी संघटनेला वाटत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांनाच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

याप्रसंगी माजी जिल्हा प्रमुख सतीश देशमुख, शेतकरी संघटनेचे माहिती व तंत्रज्ञान आघाडीचे जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर, तेल्हारा तालुका प्रमुख निलेश नेमाडे, हरिभाऊ अकोटकार, मधुकर बोचे, वामन वाळके, रवींद्र नवले, शेकडो कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. अकोला येथील नेहरू पार्क चौकात दुपारी १२ वाजता शेतकरी संघटनेच्या वतीने कांदा जाळून मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी विलास ताथोड, निलेश पाटील, धनंजय मिश्रा, अजय गावंडे, सचिन कोकाटे, मधुकर गायकवाड, विनोद टाले आदिंची उपस्थिती होती.