कोरोना प्रतिबंधाचे नियम तोडून भरतो ‘चोर बाजार’!; अकोल्यात जिल्हा आणि पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष

अकोला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या न्यायालय, मंदिरे बंद आहेत. विना मास्क फिरणारे दुचाकी चालक, ऑटो चालकांसह ऑटोतील प्रवाशांकडून पोलिस दंड आकारीत असताना शहराच्या काला चबुतरा भागात दर रविवारी कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम धाब्यावर बसवून ‘चोर बाजार’ भरविला जात आहे.

त्याकडे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शहरातील काला चबुतरा भागापासून ते अगदी टिळक रोडपर्यंतचा भाग या चोर बाजारातील व्यावसायिक व व्यापारी व्यापून टाकीत असल्याने रविवारी या परिसरात वाहन नेणे तर दूरच पायी चालणेही कठीण होते एवढी तुफान गर्दी होत असते. विशेष म्हणजे हा परिसर सिटी कोतवालीपासून हाकेच्या अंतरावर आहे.

दर रविवारी सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत नो मास्क, नो सोशल डिस्टन्सींगला हरताळ फासीत भरविल्या जात असलेल्या या चोर बाजारात  सैनिटायझेशनचा तर प्रश्नच उरत नाही. दसरा आणि ईद झाली या दोन सणांच्या दरम्यान या बाजारात मोठ्या प्रमाणावर झुंबड झाल्याचे दिसून आले. आता दिवाळी तोंडावर आहे. किमान या काळात तरी जिल्हा आणि पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घेवून या चोर बाजारात मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सींगचे पालन आणि सॅनीटायझेशन या महत्वपूर्ण बाबींवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आगामी काळात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता पाहता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग विविध प्रकारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशावेळी चोर बाजाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा बाजार पूर्वापार चालत आला असला तरी कोरोनाच्या काळात या बाजाराला मुळात परवानगी कशी दिली जाते? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

पूर्वीच्या काळी या ठिकाणी चोरीचा माल विकला जात असेल, त्यामुळे हा बाजार चोर बाजार म्हणून उदयास आला असे म्हटले जाते. सध्या या बाजारात सर्व प्रकारच्या वस्तू बाजारभावापेक्षा कमी दराने मिळत असल्याने ग्राहकांची झुंबड उडत आहे. दसरा आणि ईद निमित्ताने या बाजाराची पाहणी केली असता तेथे कोरोनासंदर्भात देण्यात आलेल्या नियमांचे व्यापारी आणि ग्राहक असे दोघांकडूनही सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे आढळून आले.