प्रतीकात्मक फोटो 
प्रतीकात्मक फोटो 

अकोला (Akola) :  भ्रष्टाचार प्रकरणात सध्या कारागृहात असलेल्या बीडीओ गोपाल बोडे याच्या विरोधात दगड पारवा येथील उपसरपंच सारिका गवई यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आणखी एक तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.  दगडपारवा येथील व्यायाम शाळा बांधकाम प्रकरणी ग्राम पंचायतच्या सहा सदस्यांनी बहुमताने सरपंच, गटविकास अधिकाऱ्यांकडे जागा बदलण्याची मागणी केली होती. सदस्यांनी मागणी केलेला विषय सरपंच व सचिव यांनी विषय पत्रिकेत न घेतल्याने मासिक सभेत सदस्यांनी ऐनवेळी येणारा विषय म्हणून मंजूर असलेल्या व्यायाम शाळा बांधकामाचे ठिकाण बदलण्याचा ठराव मंजूर करून घेतला होता.

नियमानुसार बहुमताने सदस्यांनी मागणी केलेला विषय सभेत घेणे हे सरपंच, सचिवांना बंधनकारक होते. सरपंच, सचिव हा विषय घेत नसतील तर बीडीओंनी सचिवाला सदर आदेश देणे क्रमप्राप्त होते. तथापि सदस्यांनी दिलेल्या २९ जून २०२० च्या पत्रानुसार २१ जुलै २०२० च्या सभेत पारित ठराव हा अध्यक्षांच्या परवानगी नुसार नसल्याचा अहवाल बीडीओंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास दिला. त्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषण सुरू केले होते. पं. स. सभापती प्रकाश वाहूरवाघ व वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी कारवाईचे आश्वासन दिले होते. बीडीओ गोपाल बोडेंला अटक झाली. दरम्यान, व्यायामशाळा बांधकाम सुरू झाल्याने उपसरपंच सारिका गवई यांनी बीडीओने पैसे घेऊन अहवाल दिल्याचा आरोप करीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे.