पारस विद्युत प्रकल्पातील आगीची उच्चस्तरीय चौकशी करा; प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची मागणी

    अकोला. येथून जवळच असलेल्या पारस येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या संच क्रमांक ३ व ४ या दोन्ही संचांमध्ये शुक्रवारी व शनिवारी सलग दोनवेळा आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.  आगीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष मनीष तिवारी यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह व्यवस्थापकीय संचालक संजय खंडारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
    पारस औष्णिक विद्युत प्रकल्पात सातत्याने आगीच्या घटना घडत असून, प्रभारी अधीक्षक अभियंता सचिन भगेवार यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळेच या आगीच्या घटना घडत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला असून, त्यांच्याकडील प्रभार त्वरीत काढून घेऊन आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. पारस औष्णिक प्रकल्पातील कोल मिलमध्ये लागलेल्या आगीबाबत मुख्य अभियंता यांनी कोणतीही जबाबदारी निश्चित केलेली नाही.

    केंद्रातील कोल मीलमध्ये लागलेल्या आगीत एक कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, शेकडो कबुतरे मृत्यूमुखी पडली आहेत.  या घटनेबाबत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयानेही ताशेरे ओढले असून, यासाठी अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन लाख रुपये दंड केला असून, सदरच्या दंडाची रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावी, तसेच अधीक्षक अभियंता पदाचा प्रभार त्वरित सक्षम व जेष्ठ अनुभवी अधिकाऱ्याकडे देण्यात यावा, गत दहा वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले कार्यकारी अभियंता यांची बदली करण्यात यावी आणि आगीच्या घटनेबाबत जबाबदारी निश्चित करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.