street dog in akola

रात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, अनेकांना या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना गेल्या तीन महिन्यांच्या काळात घडल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कृषी विद्यापीठाच्या पुलावर कुत्र्यांच्या टोळक्याने कब्जा केला असून, त्यामुळे एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता असल्याचे वृत्त 'दैनिक नवराष्ट्र' ने प्रकाशित केले होते.

  • 'नवराष्ट्र'च्या वृत्ताची दखल

अकोला. शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, अनेकांना या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना गेल्या तीन महिन्यांच्या काळात घडल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कृषी विद्यापीठाच्या पुलावर कुत्र्यांच्या टोळक्याने कब्जा केला असून, त्यामुळे एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘दैनिक नवराष्ट्र’ ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम मनपाने सुरु ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत दिले.

शहराच्या विविध भागांमध्ये मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला असून, अनेक बालके आणि महिलांनाही या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भात महानगरपालिकेकडे आणि संबंधित नगरसेवकांकडे नागरिकांनी तक्रारी दाखल करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही.

याचा ‘दैनिक नवराष्ट्र’ने पाठपुरावा केला असता, मनपाने मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी स्नातकोत्तर पशुवैद्यकीय महाविद्यालयाशी केलेल्या सामंजस्य कराराची मुदत संपल्याची माहिती हाती आली. परंतु ही मुदत वाढविण्यासाठी मनपाने अजूनपर्यंत कोणतीही पावले न उचलल्याने अखेर यामध्ये जिल्हाधिकारी पापळकर यांना यामध्ये लक्ष घालावे लागले.

जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत मोकाट कुत्र्यांचा प्रश्न उपस्थित झाल्यावर जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले, की मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी अकोला महानगरपालिकेने स्नातकोत्तर पशुवैद्यकीय महाविद्यालयाशी केलेल्या सामंजस्य कराराची संपलेली मुदत पुन्हा वाढवून घ्यावी व कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे काम सुरु ठेवावे.

शहराच्या मुख्य मार्गासह विविध बाजारपेठेत परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. महापालिकेत मोकाट कुत्रे पकडण्यासाठी कोंडवाडा विभाग आहे, मात्र मोकाट कुत्रे पकडण्याची मोहिम राबविली जात नाही. तूर्तास शाळा सुरु न झाल्याने चिमुकले विद्यार्थी घराबाहेर खेळतात, कुत्र्यांमुळे ही मुले-मुली भयभीत झाली आहेत, अशी तक्रार नुकतीच खुद्द मनपाच्याच महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापती मनीषा भन्साली यांनी स्थायी समितीचे सभापती सतीश ढगे यांना एका पत्रातून केली होती, हे उल्लेखनीय.