Corona in Akola is a 'target' for the elderly!
जेष्ठ नागरीक

  • जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग हतबल

अकोला (Akola).  जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये कोरोनाचा हैदोस सुरूच असून, बाधा झालेल्यांपैकी वयोवृद्धांना हा संसर्गजन्य आजार टार्गेट करीत असल्याचे एका पाहणीवरून आढळून आले आहे. त्यामुळे वयोवृद्धांची विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सप्टेंबर महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात कोरोनाने ३४ जणांचे बळी घेतले असून, त्यापैकी २५ जण हे ६० वर्षावरील वयोगटातील होते.

सप्टेंबर महिना एकप्रकारे घातकच ठरत असून, अकोला शहर व जिल्ह्यात दररोज शंभरपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत. सरकारी रूग्णालयांसोबतच खासगी रूग्णालये आणि ज्या मोजक्या हॉटेल्समध्ये कोरोना वॉर्डची स्थापना करण्यात आली आहे, त्या हॉटेल्समध्येही आजच्या तारखेस बेड उपलब्ध नसल्याचा धक्कादायक अनुभव स्वत: विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी समाजमाध्यमांमध्ये शेअर केल्याने यापुढे कोरोनामुळे बाधित होणारयांचा केवळ देवच वाली आहे, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

कोरोनाने जिल्ह्यात घेतलेल्या एकूण १८६ बळींपैकी ३४ बळी हे सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातील आहेत. या बळींपैकी २५ जण हे ६० वर्षापेक्षा अधिकच्या वयोगटातील आहेत. १४ जण ६० ते ७० वयोगटातील तर ११ जण हे ७० ते ८० वयोगटातील आहेत. कोरोनामुळे दगावलेल्या तरुणांची संख्या अत्यल्प आहे. या महिन्यात कोरोनाचे बळी ठरलेल्यांमध्ये तीनजण ३० ते ४० या वयोगटातील, एकजण ४० ते ५० वयोगटातील तर पाच जण ५० ते ६० या वयोगटातील आहेत. या काळात दगावलेल्या नऊपैकी दोन महिला ४० पेक्षा कमी वयाच्या तर इतर सात महिला ५० ते ७० या वयोगटातील होत्या. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींनी घरातील वयोवृद्धांची विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.