कोरोना नियंत्रणाबाहेर, अधिकारी नियुक्तीचा फार्स; नियम मोडणाऱ्यांवरील कारवाईकडे कानाडोळा

कडक निर्बंध लादूनही कोरोना नियंत्रणात येण्यास तयार नसल्याचे पाहून आता महानगरपालिका प्रशासनाने नियंत्रण अधिकारी नियुक्तीचा फार्स सुरू केला आहे. शहरात सर्वदूर पसरलेल्या कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी, यापूर्वी करण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी व्यवस्थितपणे होत नसल्याचे दिसून आल्याने त्याची अंमलबजावणी व्हावी

  अकोला (Akola).  कडक निर्बंध लादूनही कोरोना नियंत्रणात येण्यास तयार नसल्याचे पाहून आता महानगरपालिका प्रशासनाने नियंत्रण अधिकारी नियुक्तीचा फार्स सुरू केला आहे. शहरात सर्वदूर पसरलेल्या कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी, यापूर्वी करण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी व्यवस्थितपणे होत नसल्याचे दिसून आल्याने त्याची अंमलबजावणी व्हावी या हेतूने मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी तीन अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

  नियुक्त करण्यात आलेल्या तीन अधिकाऱ्यांपैकी महानगरपालिकेचे मालमत्ता कर अधीक्षक विजय पारतवार यांच्याकडे सहायक आयुक्त पूनम कळंबे रुजू होईपर्यंत पूर्व झोनची जबाबदारी देण्यात आली आहे तसेच नगरसचिव अनिल बिडवे यांच्याकडे पश्चिम आणि उत्तर झोनची जबाबदारी तर मालमत्ता अधीक्षक संदीप गावंडे यांच्याकडे दक्षिण झोनची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संबंधित झोनच्या झोनल अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून आशा वर्करच्या माध्यमातून या नियंत्रण अधिकाऱ्यांना कामकाज करावे लागणार आहे.

  कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर हायरिस्क, लो रिस्क व्यक्तींना शोधणे आदि कामे करावी लागणार आहेत. त्याचबरोबर कोरोनासंदर्भात उपाययोजनांची आतापर्यंत न झालेल्या काटेकोर अंमलबजावणीचीदेखील जबाबदारी देण्यात आली आहे. मुळात जिल्हा प्रशासनाने सकाळी 11 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे, परंतु त्या वेळेनंतरही गल्लीबोळातील अनेक दुकाने उघडी असतात. त्यांच्यावरील कारवाईकडे मनपाचा कानाडोळा होत आहे. अशा दुकानांमध्ये होणारी गर्दी कोरोनाला आमंत्रण देत आहे.

  जनता बाजारात फळांची दुकाने!
  दरम्यान, जनता भाजीबाजारात भाजी आणि फळांची विक्री पूर्णपणे बंद करण्याचे आदेश महानगरपालिकेने दिले होते, परंतु त्या आदेशाला हरताळ फासत काहीजणांनी याठिकाणी पुन्हा फळविक्रीची दुकाने थाटल्याचे चित्र आहे. त्यांच्यावर मनपाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यावरून कोरोना प्रतिबंधासाठी मनपाने केलेल्या उपाययोजना किती फुसक्या आहेत हेच सिद्ध होते. जनता बाजारात भाजी आणि फळविक्रीला मज्जाव करणारा आदेश महानगरपालिकेने गेल्या आठवड्यातच जारी केला होता, हे विशेष. हा आदेश 2 मेपर्यंत लागू राहणार आहे, परंतु तत्पूर्वीच पुन्हा फळ विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यामुळे जनता भाजीबाजारामध्ये ग्राहक आणि फळ विक्रेत्यांची प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

  याठिकाणी अनेकजण विनामास्क फिरताना दिसत होते, दुसरीकडे फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचेही पहावयास मिळाले. त्यामुळे मनपाने कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना किती तकलादू स्वरूपाच्या आहेत, हेच यावरून सिद्ध होते. त्यामुळे कोरोना नियंत्रणासाठी नियंत्रण अधिकारी नियुक्त करण्याची मनपा प्रशासनाची कृती ही केवळ फार्स असल्याचा आरोप होत आहे.