Fire to House because of LPG Cylinder leakage
सिलेंडरमधून वायूगळती झाल्याने घराला लागलेली आग

  • प्राणहानी टळली, साहित्य जळून खाक

तेल्हारा (जि.अकोला) (Akola). तालुक्यातील हिवरखेड नजीक असलेल्या हिंगणी येथे एका घरात गॅस सिलेंडरचा भडका झाल्याने लागलेल्या आगीत जवळपास तीन ते चार घरे पूर्णतः तर दोन ते तीन घरे अंशतः जळाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील हिवरखेड नजीक असलेल्या हिंगणी येथे एका घरात सायंकाळच्या वेळेस स्वयंपाक करणे सुरू असताना अचानक गॅस सिलेंडरचा भडका उडाला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. घरातील व्यक्तींनी प्रसंगावधान राखून बाहेर पळ काढला त्यामुळे प्राणहानी टळली. परंतु आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले. यावेळी सोसाट्याचा वारा सुटल्याने ही आग आजुबाजूच्या घरांमध्येही पसरली. त्यामध्ये जवळपास तीन ते चार घरे पूर्णतः तर दोन ते तीन घरे अंशतः जळाल्याचे समजते.

ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही, त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळावर तेल्हारा अग्निशमन दल आणि हिवरखेड पोलिस पोहचले असून, आग नियंत्रणात आली असल्याची माहिती मिळाली आहे. या आगीत सहा ते सात घरातील साहित्याची राखरांगोळी झाली. गरीब कुटुंबांना शासनाने मदत करावी, अशी मागणी केली जात आहे.