कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केवळ २६ टक्के; शासकीय उद्देशावर फेरले पाणी

गेल्या चौदा महिन्यांपासून सर्वत्र थैमान घालित असलेल्या कोरोनाने अकोला जिल्ह्यात याही वर्षी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रमाचे तीनतेरा वाजविले आहेत. मार्च 2021 च्या अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात अकोला जिल्ह्यात केवळ 26 टक्के कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांची आरोग्य विभागाच्या अहवालात नोंद करण्यात आली आहे.

    रूबेन वाळके
    अकोला (Akola).  गेल्या चौदा महिन्यांपासून सर्वत्र थैमान घालित असलेल्या कोरोनाने अकोला जिल्ह्यात याही वर्षी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रमाचे तीनतेरा वाजविले आहेत. मार्च 2021 च्या अखेरीस संपलेल्या आर्थिक वर्षात अकोला जिल्ह्यात केवळ 26 टक्के कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांची आरोग्य विभागाच्या अहवालात नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मार्चअखेर 33 टक्के शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या.

    गेल्या चौदा महिन्यांपासून जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये कोरोनाने हैदोस घातला आहे. गेल्यावर्षीपेक्षा कोरोनाची ही दुसरी लाट भयानक ठरत चालली आहे. दररोज पाचशेच्या आसपास बाधित सापडत असून, दररोज किमान दहा जणांचे बळी जात आहेत. अशावेळी केंद्र आणि राज्य सरकारमार्फत राबविले जाणारे सर्वच आरोग्य विषयक कार्यक्रम प्रभावीत झाले आहेत. त्यामध्ये कुटुंब नियोजनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचाही समावेश आहे. प्रत्येक वर्षी सर्व जिल्ह्यांना शहरी आणि ग्रामीण भागातील पुरूष आणि महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे ‘टार्गेट’ अर्थात ‘लक्ष्य’ दिले जाते. अकोला जिल्ह्याला सन 2020- 2021 साठी 8 हजार 097 शस्त्रक्रियांचे टार्गेट देण्यात आले होते. त्यामध्ये पुरूषांच्या 674 आणि महिलांच्या 7 हजार 423 शस्त्रक्रियांचा समावेश होता.

    कोरोनाच्या पृष्ठभूमीवर सर्वच ठिकाणी शासनाने लावलेल्या कडक निर्बंधांमुळे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचा कार्यक्रमही रेंगाळला आहे. कोठेही या शस्त्रक्रियांसाठीची शिबीरे आरोग्य विभागाला लावता आलेली नाहीत त्यामुळे पुरूषांच्या शून्य टक्के शस्त्रक्रियांची नोंद झाली आहे. दुसरीकडे टप्याटप्याने महिलांच्या करण्यात आलेल्या शस्त्रक्रियांची नोंद घेण्यात आली आहे. त्यामध्ये शहरी भागात 2 हजार 136 तर ग्रामीण भागात केवळ 5 अशा एकूण 2 हजार 141 महिलांच्या टाक्याच्या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. अर्थात संपूर्ण जिल्ह्यात महिलांच्या शस्त्रक्रियांची टक्केवारी केवळ 26 नोंदविली गेली आहे.

    गेल्या बारा महिन्यांच्या काळात पुरूषांची बिनटाक्याची एकही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली नाही अर्थात दोन अपत्यांवर पुरूषांच्या शस्त्रक्रिया होण्याचा प्रश्नच त्यामुळे उद्भवला नाही. ग्रामीण भागात 1 हजार 276 आणि शहरी भागात केवळ 2 अशा एकूण 1 हजार 278 महिलांनी मात्र दोन अपत्यांवर कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. या शस्त्रक्रिया शासकीय आरोग्य संस्थांमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करीत पार पाडण्यात आल्या. जिल्ह्याला अशा 5 हजार 263 शस्त्रक्रियांचे टार्गेट देण्यात आले होते. परंतु ते अर्थातच पूर्ण होऊ शकले नाही.