आगग्रस्त वृद्ध कुटुंबाला ५ हजार रूपयांची आर्थिक मदत; आगीत साहित्य आणि रोख रक्कम जळून खाक

पातूर तालुक्यातील शिर्ला गावातील खदान परिसरामध्ये वृद्ध कुटुंबाचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या कुटुंबाला शासनाकडून 5,000 रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

    पातूर (Patur).  तालुक्यातील शिर्ला गावातील खदान परिसरामध्ये वृद्ध कुटुंबाचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या कुटुंबाला शासनाकडून 5,000 रूपयांची आर्थिक मदत देण्यात आली. शिर्ला गावातील खदान परिसरामध्ये सावजी रामचंद्र बळकर, वय 70 वर्ष, हे आपल्या वयोवृद्ध पत्नीसोबत राहतात. 5 एप्रिल 2021 च्या मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास त्यांच्या घराला अचानक आग लागल्यामुळे घरातील सगळे साहित्य आणि रोख रक्कम जळून खाक झाली.

    यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे मिळालेले तीन हजार रुपये, सायकल, काही कोंबड्या, बकरीचे पिल्लू आणि घरातील कपडेलत्ते, खाण्यापिण्याचे साहित्य सर्व जळून गेल्यामुळे सदरचे वृद्ध कुटुंब निराधार झाले होते.

    घटनेची माहिती मिळताच पातूर तहसील कार्यालयातील तलाठी एस.जी. मीलके यांनी पातूर तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी जाऊन घराचा पंचनामा करून या वृद्ध कुटुंबाला शासनाच्या वतीने 5000 रुपयांची आर्थिक मदत केली.