बँकांच्या संपामुळे आवळल्या आर्थिक नाड्या; सर्वसामान्य जण वेठीस

केंद्र शासनाचे बँकांचे खासगीकरण धोरण अत्यंत घातक असून त्याविरोधात सोमवार व मंगळवारी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सअंतर्गत संप पुकारण्यात आला आहे. संपाला अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला.

  अकोला (Akola).  केंद्र शासनाचे बँकांचे खासगीकरण धोरण अत्यंत घातक असून त्याविरोधात सोमवार व मंगळवारी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सअंतर्गत संप पुकारण्यात आला आहे. संपाला अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून खासगीकरणाला तीव्र विरोध केला. संपात बँकातील कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले आहेत.

  पहिल्याच दिवशी त्याचा परिणाम दिसून आला. अकोला पोलिस प्रशासनाने परवानगी न दिल्यामळे सर्व बँक कर्मचाऱ्यांनी सरकारचा व प्रशासनाचा निषेध नोंदवून कडेकोट बंद पाळला. एक दिवस आधी प्रशासनाने सर्व बँक कर्मचाऱ्यांना फोनवरून संपात सामील न होण्याची नोटीस दिली होती. त्याचाही निषेध नोंदविण्यात आला. मात्र, कोरोना व 144 कलम पाहता बँक कर्मचाऱ्यांनी एकत्र येणे टाळले. कोट्वधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले.

  विभागातील १५९८ कर्मचाऱ्यांचा सहभाग
  अमरावती विभागातील 1598 कर्मचारी संपात सामील झाल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली. संपाची तीव्रता लक्षात घेऊन केंद्र शासनाला बँकांचे खासगीकरण धोरण मागे घेण्यास बाध्य करू, असा निर्धारही व्यक्त करण्यात आला.

  खासगीकरणाचा अट्टाहास कशापायी
  ज्या उद्देशाने बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते. त्या उद्देशाला तिलांजली देण्याचे काम केंद्र शासन करीत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना बँकांच्या खासगीकरणावर भर दिला. तो ग्राहक तसेच विविध घटकांना मारक असून त्याचा शासनाने फेरविचार करावा म्हणून संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे. यापुढे आंदोलन तीव्र होईल, असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर, स्थानिक कामगार नेते श्याम माईनकर, दिलीप पिटके, प्रवीण महाजन, अनिल मावळे यांनी संपाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

  बँकांचे एटीएमही बंद
  संपामुळे राष्ट्रीयीकृत बँकांचे एटीएम देखील काम करेनासे झाले होते. त्यामुळे ग्राहकांना खासगी बँकांकडे वळावे लागले. सेवानिवृत्तांना पेंशन मिळण्यात अडचण आल्याची माहिती काहींनी दिली. मंगळवारीही संप असल्याने ग्राहकांनी त्या बाबत जागरुक राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

  ४ दिवसांपासून बँकांचे कामकाज ठप्प
  गेल्या आठवड्यात शनिवार, रविवारी सुटी आणि सोमवार, मंगळवारी संप असल्याने चार दिवस बँकांचे कामकाज ठप्प आहे. ज्या एटीएममध्ये पैसे होते तेही संपल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. बँकिंग व्यवहारावर अवलंबून असणाऱ्या ग्राहकांना अन्य पर्याय शोधावा लागत आहे.