gandhigiri agitation in akola by shivsena

अकोला. शहरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना नगरसेवकांनी महानगरपालिका आयुक्तांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करीत अभिनव आंदोलन केले.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ, गुंठेवारी प्रकरणातील घरपट्टे, अमृत योजनेच्या कामांमुळे ठिकठिकाणी उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती, हिंदू स्मशानभूमीसाठी जागेची उपलब्धता अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शहर शिवसेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांच्या कक्षासमोर ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती.

परंतु हे आंदोलन स्थगित करून शिवसेना नगरसेवकांनी मनपा आयुक्तांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी केली.
शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी महानगरपालिकेच्या कामकाजाबाबत रोष व्यक्त केला. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलांचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थींना हेलपाटे घ्यावे लागत आहेत.

यासंदर्भात आयुक्तांशी झालेल्या चर्चेत शिवसेना नगरसेवकांना या योजनेतील अडचणी दूर करून लाभार्थींना दिलासा देण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले होते, परंतु नंतर कोणतीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवकांनी आंदोलनाची भूमिका घेत या आंदोलनाच्यावेळी आयुक्त कापडणीस हे त्यांच्या कक्षात उपस्थित नसल्याने अखेर त्यांच्या खुर्चीलाच हार घालून आयुक्तांना काम करण्याची सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना केली. यावेळी राजेश मिश्रा, गजानन चव्हाण, मंजूषा शेळके आदि उपस्थित होते.