आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील विधवांना साडी चोळी देऊन केली मदत

पातूर शहरातील सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने कोरोनाची परिस्थिती बघता शासनाच्या नियमांचे पालन करीत आदर्श शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील विधवांना साडी चोळी देण्यात आली तसेच महाराष्ट्र केसरी स्पर्धेत निवड झाल्यामुळे तरुण पैलवानांचाही सन्मान करण्यात आला.

    पातूर (Patur).  शहरातील सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने कोरोनाची परिस्थिती बघता शासनाच्या नियमांचे पालन करीत आदर्श शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटूंबातील विधवांना साडी चोळी देण्यात आली तसेच महाराष्ट्र केसरी स्पर्धेत निवड झाल्यामुळे तरुण पैलवानांचाही सन्मान करण्यात आला.

    कुटूंबातील कर्ताधर्ता, प्रमुख व्यक्ती नापिकी व कर्जाला कंटाळून मागचा पुढचा कसलाच विचार न करता जीवन संपवून जगाचा निरोप घेतो. अशा परिस्थितीत कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलून आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार आणि उत्तम शिक्षण देण्याकरिता स्वतः काबाडकष्ट करीत समाजासमोर एक आदर्श निर्माण करते. अशा साहसी महिलांचा साडी चोळी देऊन यावेळी सन्मान करण्यात आला. दरम्यान, युवा पैलवान आदर्श संजय पेंढारकर व शिव संजय यादव यांची महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी निवड झाल्याने व होऊ घातलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये त्यांनी विजयी होवून पातूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवावा यासाठी दोन्ही पैलवानांना प्रोत्साहन देत त्यांचाही सन्मान करण्यात आला.

    कोरोना काळात आदर्शमय छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती साजरी केल्याने पातूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी तसेच पोलिस निरीक्षक राऊत, उपनिरीक्षक अमोल गोरे यांनी उत्सव समितीचे कौतुक करून त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला. यावेळी ठाणेदार गवळी यांनी युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान चरित्राबद्दल माहिती दिली. तसेच कुठलेही कार्य करताना सकारात्मकता असणे खूप महत्वाचे आहे म्हणजे ते कार्य सिद्धीस गेल्याखेरीज राहत नाही, असे मत पातूर तालुका विकास मंचाचे किरणकुमार निमकंडे यांनी यावेळी व्यक्त केले. पातूर तालुका विकास मंचाचे संयोजक ठाकूर शिवकुमारसिंह बायस यांनी सत्कार व सन्मानासाठी लागणारे सर्व साहित्य तात्काळ उपलब्ध करून दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनंत उर्फ बालू बगाडे, पैलवान संजय यादव, पैलवान मंगेश गाडगे, पैलवान कैलास बगाडे व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

    याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पातूर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नगरसेवक राजूभाऊ उगले, प्रदिप काळपांडे, माजी नप उपाध्यक्ष विजू काळपांडे, सुरेश फुलारी, गुलाबराव गाडगे, अरुण पाटील, अर्जुन लसनकार, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन बारोकार, पिंपळेश्वर ग्रुपचे अध्यक्ष संतोष हिरळकार, महेश बोचरे, रामेश्वर वाढी, पवण तायडे, अजय अलाट, संतोष लसनकार, सिदाजी महाराज व्यायाम शाळेचे सर्व सदस्य तसेच पिंपळेश्वर व्यायाम शाळेचे सर्व सदस्य, तपे हनुमान व्यायाम शाळेचे सर्व सदस्य व उपस्थित सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक इतर मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन किरणकुमार निमकंडे यांनी तर आभार पैलवान बालूभाऊ बगाडे यांनी मानले.