If you have real strength, name Ahmedabad as Karnavati, Amol Mitkari challenges BJP

भाजपात खरी ताकद असेल तर दिलेला शब्द पाळा आणि अहमदाबाद शहराचं नाव कर्णावती करुन दाखवा, असं आव्हान मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे.

अकोला : महाराष्ट्रात सध्या शहराच्या नामांतरावरुन जोरदार गदारोळ सुरु आहे. शहराच्या नामांतरावरुन महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु आहे. यावरुनच राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शहरांची नाव बदलण्यापेक्षा तुमची प्रवृत्ती बदला, अशी खरपूस टीका मिटकरींनी भाजपवर केली आहे.

तसेच भाजपात खरी ताकद असेल तर दिलेला शब्द पाळा आणि अहमदाबाद शहराचं नाव कर्णावती करुन दाखवा, असं आव्हान मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं आहे. औरंगाबादच्या नामांतरावरुन चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला मिटकरींनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

औरंगाबादच्या नामांतरावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी शिवसेना आणि काँग्रेसवर टीका केली होती. औरंगाबादचं नामकरण हा श्रद्धेचा विषय आहे, संभाजीनगर हे नाव सगळ्यांना मान्य असून हा राजकारणाचा विषय नाही. तसेच औरंगाबाद महापालिकेत सत्ता आल्यास पहिल्या दिवशी संभाजीनगर, असं नामकरण करु असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.