लाखपुरी ते दातवी रस्त्याचे रूपडे पालटण्यास सुरूवात; मिनल नवघरे यांच्या प्रयत्नांला यश

मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी सर्कल मधील दातवी, मंगरुळ कांबे, जांभा, लाईत, रसलपुर, रेपाटखेड, दुर्गवाडा, सांगवी वाघझडी या गावांसाठी महत्वाचा असलेल्या लाखपुरी ते दातवी रस्त्याचे रूपडे पालटण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

    मूर्तिजापूर (Murtijapur).  तालुक्यातील लाखपुरी सर्कल मधील दातवी, मंगरुळ कांबे, जांभा, लाईत, रसलपुर, रेपाटखेड, दुर्गवाडा, सांगवी वाघझडी या गावांसाठी महत्वाचा असलेल्या लाखपुरी ते दातवी रस्त्याचे रूपडे पालटण्यास सुरूवात करण्यात आली आहे. या रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू करून नागरिक आणि वाहनधारकांना दिलासा द्यावा यासाठी पंचायत समितीच्या माजी सदस्या मिनल नवघरे यांनी घेतलेल्या पुढाकाराला अखेर यश आले आहे.

    तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्ते दुरुस्तीला खो देण्यात आला होता त्यामुळे लाखपुरी ते दातवी रस्त्यासह सर्वच कच्चे रस्ते नागरिक आणि वाहनधारकांसाठी धोकादायक व जीवघेणे ठरत होते. अनेक किरकोळ आणि काही मोठे अपघात होवून अनेकांना जखमी व्हावे लागले होते. त्यासाठी पंचायत समितीच्या माजी सदस्या मिनल नवघरे यांनी या रस्त्याची पावसाळ्यापूर्वी दुरूस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. गावांमधील रस्त्यांच्या विकासाकडे स्थानिक लोकप्रतिनीधी आणि संबंधित विभागातील अधिका-यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.

    या परिसरातील रस्त्यांना कुठे खडीकरणाची तर कुठे डांबरीकरणाची प्रतिक्षा आहे. लाखपुरी सर्कलमध्ये लाखपुरी ते दातवी, मंगरुळ कांबे, जांभा, रेपाटखेड, पायटांगी, दुर्गवाडा या गावातील रस्त्यांचा समावेश आहे. रस्त्यांच्या कामात होणारा भ्रष्टाचार यामुळेच रस्त्यांचे काम निकृष्ट होऊन ते अल्पावधीच खराब होतात, असा आरोप माजी पं.स.सदस्या मिनल नवघरे यांनी निवेदनातून केला होता. त्यांनी याबाबतचे निवेदन 23 मार्च 2021 रोजी संबंधित विभागाला दिले होते. यावेळी त्यांनी आठ दिवसांत प्रश्न मार्गी न निघाल्यास आंदोलन करण्याचा इशारासुध्दा दिला होता.

    अखेर त्यांच्या इशा-याची दखल घेत 4 एप्रिल 2021 रोजी लाखपुरी ते दातवी रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. आता इतर गावातील रस्त्यांची कामेही लवकर सुरु होणार नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशारा मिनल नवघरे यांच्यासह तालुका सहसचिव रोशन वानखडे, अतुल नवघरे, रविकुमार वानखडे, संघपाल नितोने यांनी दिला आहे.