जनावरांमध्ये झपाट्याने पसरत असलेल्या लम्मी नामक चर्मरोगाने प्राण्यांच्या शरीराची होणारी अवस्था
जनावरांमध्ये झपाट्याने पसरत असलेल्या लम्मी नामक चर्मरोगाने प्राण्यांच्या शरीराची होणारी अवस्था

  • जनावरांच्या वाहतुकीस मनाई!
  • अकोला जिल्हाधिका-यांचे आदेश

अकोला (Akola).  राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये ‘लम्पी स्कीन डिसीज’ या विषाणू संसर्गातून जनावरांना होणा-या चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्याचाही समावेश आहे. बाधित जनावरांच्या संपर्कात निरोगी जनावर आल्यास त्यातून होणारा हा संसर्गजन्य आजार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशू (गाई व म्हशी) पालकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, जनावरांच्या वाहतुकीस बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

याबाबत जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. तुषार बावने यांनी दिलेल्या माहितीनुसार, पशुसंवर्धन विभागाने यासंदर्भात कोणत्या उपाययोजना राबवाव्यात यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेऊन जनावरांच्या वाहतुकीस मनाई करण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच मनपा आयुक्त, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांना यासंदर्भात सर्व उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

लम्पी चर्मरोग संसर्ग म्हणजे काय?
जनावरांना होणारा आजार हा विषाणूजन्य संसर्गजन्य आहे. लम्पी चर्मरोग हा संसर्गजन्य विषाणूजन्य आजार असून, देशी वंशाच्या जनावरांपेक्षा संकरित जनावरांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. या आजाराचा प्रसार बाधित जनावरांच्या विविध स्त्रावांमधून इतर जनावरांना होतो, तसेच त्वचेवरील खपल्यामध्ये हा विषाणू अंदाजे १८ ते ३१ दिवस जिवंत राहतो. या रोगाचा प्रसार डास, माशा, गोचीड इत्यादिंच्या चावण्यामुळे जनावरांना होतो व आजारी जनावरापासून निरोगी जनावरांना त्याचा संसर्ग होतो. या आजारामध्ये जनावरांना ताप येतो तसेच त्वचेच्या खाली २ ते ५ सेंमीच्या गाठी येतात.

जनावरांची ने-आण करण्यास मनाई
——- या आजाराचा जनावरांमध्ये फैलाव होऊ नये व संसर्ग रोखता यावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने काही बाबींना मनाई करण्यात आली आहे. त्यानुसार गुरे व म्हशी यांची ने-आण करणे, कोणत्याही व्यक्तीस, बाधित जिवंत अथवा मृत प्राणी, बाधित प्राण्यांच्या संपर्कात आलेली वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा कोणताही भाग किंवा अशा प्राण्यापासूनचे अन्य कोणतेही उत्पादन बाधित क्षेत्रामधून बाहेर नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरविणे, शर्यती लावणे, जत्रा भरविणे, प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणतेही अन्य काम पार पाडणे, यास मनाई करण्यात आली आहे. नियंत्रित क्षेत्रामधील बाजारपेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी उक्त बाधित झालेल्या गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे, या गोष्टींनाही मनाई करण्यात आली आहे.