नगरसेविकेला दम देण्यावरून नगर परिषदेमधील वातावरण चिघळले!

अकोला जिल्ह्यातील आकोट येथील नगर परिषदेमधील भाजपा अंतर्गत सुरू असलेला कलह चव्हाट्यावर आणणारी घटना येथील अग्रसेन भवनात घडली. प्रभागातील रस्ते प्रस्तावित करावेत तसेच मंजूर पाइपलाइन टाकण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या नगरसेविकेला अकोटचे नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे यांनी दम दिल्याचे बोलले जाते, यावरून संतप्त झालेल्या नगरसेविका पतीने मोकोडे यांच्या कानशिलात लगावल्याने एकच खळबळ उडाली.

  •  नगरसेविका पतीने लगावली नगराध्यक्षाच्या कानशिलात!
  • भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

आकोट (Akot) :  अकोला जिल्ह्यातील आकोट येथील नगर परिषदेमधील भाजपा अंतर्गत सुरू असलेला कलह चव्हाट्यावर आणणारी घटना येथील अग्रसेन भवनात घडली. प्रभागातील रस्ते प्रस्तावित करावेत तसेच मंजूर पाइपलाइन टाकण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या नगरसेविकेला अकोटचे नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे यांनी दम दिल्याचे बोलले जाते, यावरून संतप्त झालेल्या नगरसेविका पतीने मोकोडे यांच्या कानशिलात लगावल्याने एकच खळबळ उडाली.

शहरातील नंदीपेठ प्रभाग क्र. 16 मध्ये दीपाली रवींद्र केवठी या भाजपच्या नगरसेविका कार्यरत आहेत. त्यांच्या प्रभागात पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम मंजूर झाले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला काम सुरू करण्याबाबत विचारणा केली असता, कंत्राटदाराने नगराध्यक्षांनी सांगितले तर काम सुरू करतो, असे सांगितले. त्यामुळे नगरसेविका केवठी यांनी नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे यांची भेट घेऊन रस्त्याचे काम सुरू करा, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी पाइपलाइन टाकण्याकरिता कंत्राटदाराला सांगा, अशी विनंती केली; मात्र नगराध्यक्ष माकोडे यांनी ”जा, नाही करीत तुझे काम, काय होते ते करून घे…” असा आपल्याला दम भरल्याचा केवठी यांचा आरोप आहे. दरम्यान, आपल्या पत्नीला नगराध्यक्षांनी अशी अपमानास्पद वागणूक दिल्याचे नगरसेविका पती रवींद्र केवटी यांना कळताच त्यांनी नगराध्यक्षांना यासंदर्भात विचारणा केली असता, त्यांच्यात बाचाबाची होवून संतप्त रवींद्र केवटी यांनी नगराध्यक्ष माकोडे यांच्या कानशिलात लगावली. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी मध्यस्थी करून भाजप पदाधिकाऱ्यांनी सावरासावर केली.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ.प्रा.नितीन धांडे यांच्या संपर्क दौ-यानिमित्ताने स्थानिक अग्रसेन भवनमध्ये भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक मतदारांची बैठक पार पडली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, माजी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, उमेदवार नितीन धांडे उपस्थित होते. यावेळी अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे मात्र उपस्थित नव्हते. अचानक नगराध्यक्षांच्या कानशिलात लगावल्याचे पाहून कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी नगरसेविका पती व नगराध्यक्ष यांच्याकडे धाव घेतली आणि प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला.

शहरातील प्रभागात पाणी पुरवठा योजना मंजूर असून, त्याचे काम संथगतीने सुरू आहे. नगरसेविका पती रवींद्र केवटी यांना मात्र सबुरी नाही. ”काम सुरू होणार की नाही”, असे त्यांनी विचारल्यावर आपण त्यांना ”नाही होत”, म्हटल्यावर त्यांनी हात उगारला. याबाबत आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार करणार आहे.
— हरिनारायण माकोडे (नगराध्यक्ष, नगर परिषद, अकोट)