कोरोनाग्रस्त ३०० पेक्षा जास्त मृतदेहांवर रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार

  • ३०० च्यावर कोरोनाग्रस्त मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार
  • 'कच्छी-मेमन जमात ट्रस्ट' ने निर्माण केला आदर्श

अकोला (Akola).     कोरोनाने मरण पावलेल्या व्यक्तीचे नातेवाईकही त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास पुढे येत नसल्याचे पाहून ‘जनसेवा’ हीच ‘अल्लाहची इबादत’ असल्याचे ब्रीद समोर ठेवून अकोल्यातील ‘कच्छी-मेमन जमात ट्रस्ट’ ही राष्ट्रीय आणि सामाजिक एकात्मतेसाठी झटणारी मुस्लिम संघटना पुढे सरसावली आहे. या संघटनेमधील मुस्लिम युवकांच्या पथकाने गेल्या सहा महिन्यांच्या काळात अशा कोरोनाग्रस्त ३०० च्यावर मृतदेहांवर त्या त्या धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

नोव्हेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान प्रांतात जन्मास आलेल्या कोरोना महामारीची दहशत मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत अकोल्यात येवून धडकली. अकोला कोरोनापासून सुरक्षित असल्याचा दावा जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग करीत असतानाच ७ एप्रिल या जागतिक आरोग्य दिनीच कोरोनाने अकोल्याचा दरवाजा ठोठावला. त्यादिवशी जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला. पाहता पाहता त्याने अक्राळ विक्राळ रूप धारण करण्यास सुरूवात केली. १२ एप्रिल रोजी कोरोनाने अकोला जिल्ह्यातील पहिला बळी घेतला. तोपर्यंत जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाचीही पाचावर धारण बसली होती तेथे सर्वसामान्य माणसाची काय बिशाद? कोरोनाने मरण पावलेल्या व्यक्तीचे नातेवाईकही त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास पुढे येत नसल्याचे पाहून ‘जनसेवा’ हीच ‘अल्लाहची इबादत’ असल्याचे ब्रीद समोर ठेवून अकोल्यातील ‘कच्छी-मेमन जमात ट्रस्ट’ ही राष्ट्रीय आणि सामाजिक एकात्मतेसाठी झटणारी मुस्लिम संघटना पुढे सरसावली. या कोरोना महामारीच्या काळात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या मदतीला धावत या संघटनेने संपूर्ण समाजाला खरया मानवतेची ओळख करून दिली.

अकोल्यात कोरोनाच्या आगमनाच्या अगदी पहिल्या दिवसापासून ‘कच्छी-मेमन जमात ट्रस्ट’ ही संघटना संकटकाळात कोरोनाग्रस्तांच्या आरोग्यासाठी आणि कोरोनाने मरण पावलेल्या जीवांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अग्रेसर राहिली आहे. जे मानवतेचे कार्य ही संघटना गेल्या सहा महिन्यांपासून इमानेइतबारे आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता करीत आहे, त्याद्वारे मुस्लिम युवकांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. जावेद जकारिया, तन्वीर खान, साबीर कुरेशी, आसिफ अहमद खान, अज़ीज़ खान, नदीम खान, शेख इरफान, बाबा भाई, जावेद खान शाबाज़ खान, वसीम भाई, समीर खान आदींचा समावेश असलेल्या या पथकाने पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रुग्णांवर मोफत उपचाराचे काम करतानाच प्रसंगी आर्थिकदृष्ट्या अक्षम असलेल्या गोरगरीबांनाही सढळ हाताने मदत केली. या ‘कच्छी-मेमन जमात ट्रस्ट’ने स्वखर्चाने कोरोनाकाळात संकटात अडकलेल्यांसाठी दोन अॅम्बुलन्स मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत, हेही नसे थोडके!

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ आणि अकोला महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी प्रशांत राजूरकर हेदेखील या युवकांना सर्वतोपरी सहकार्य करीत आहेत. मोहता मील स्मशानभूमीचे अध्यक्ष श्याम राठी तसेच दीपक शिंदे, मासुमशाह कब्रस्तानचे अध्यक्ष हाजी मुदामभाई यांचेही पाठबळ त्यांना मिळत असून, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागासाठी हे युवक हक्काचे आणि इतर सर्वच समाजातील युवकांसाठी आदर्श ठरले आहेत. १२ एप्रिल रोजी आसामच्या एका कोरोनाग्रस्त युवकाने आत्महत्या केल्यानंतर या युवकांनी त्याचा दफनविधी केला. तेथून सुरू झालेला त्यांचा हा सेवा कार्याचा दीप अजूनही तेवत आहे.

गेल्या सुमारे सहा महिन्यांच्या काळात त्यांनी अकोल्यातील सर्वोपचार रूग्णालयासोबतच ओझोन आणि आयकॉन या खासगी रूग्णालयातून तसेच लगतच्या वाशिम, बुलडाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचे मृतदेह वाहून नेण्याचे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्काराचे कार्य केले. या दरम्यानच्या काळात त्यांनी ३०० पेक्षा अधिक मृतदेहांवर त्या त्या समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले. या पथकातील जावेद खान याने त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्या दिवशीही बुलडाणा येथील एका व्यक्तीचा मृतदेह रुग्णवाहिकेने घरी पोहोचविला. जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. अशा संकटाच्यावेळी ‘कच्छी-मेमन जमात ट्रस्ट’ने आरंभिलेल्या या महान सेवाकार्याची नोंद इतिहासात सुवर्णाक्षराने केली गेल्यास नवल वाटायला नको.