समृद्धी’च्या वाहनांमुळे रस्त्यांची चाळणी; दोन जिल्ह्याला जोडणारा रस्ता खड्ड्यात

अकोला आणि वाशीम जिल्ह्यातून जाणा-या समृद्धी महामार्गाचे व रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच मार्गावरून जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जउळका रेल्वे ते माळेगाव पर्यंत अंदाजे 14 किलोमीटर रस्त्याची चाळणी झाली आहे.

    जऊळका रेल्वे (Jaulka Railway).  अकोला आणि वाशीम जिल्ह्यातून जाणा-या समृद्धी महामार्गाचे व रेल्वेच्या विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याच मार्गावरून जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने जउळका रेल्वे ते माळेगाव पर्यंत अंदाजे 14 किलोमीटर रस्त्याची चाळणी झाली आहे.

    अकोला- वाशीम या दोन जिल्ह्याला जोडणारा कमी अंतराचा मार्ग तालुक्यातून जऊळका रेल्वे, वडी, धमधमी, अमानवाडी, माळेगाव, साखरवीरा लोहगड, बार्शिटाकळी या मुख्य गावांना जोडणारा आहे. या मार्गावरून वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे. मुंबई-नागपूर जलद महामार्ग निर्माण करून शहरी लोकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी समृद्धी महामार्गाची निर्मिती करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे. स्थानिक ग्रामीण भागातील रस्त्यांवरच ग्रामीण भागाचा विकास आधारित असतो. पूर्णा अकोला रेल्वेच्या विद्युतीकरणासह मुंबई नागपुर समृद्धी महामार्गाचे काम जलद गतीने सुरू आहे. महामार्ग निर्माण करण्यासाठी जऊळका रेल्वेपासून जवळ असलेल्या वरदरी (खुर्द) या गावाजवळ कॅम्प कार्यरत आहे.

    त्या कामी दळणवळणासाठी जऊळका (रेल्वे) ते माळेगाव या स्थानिक मार्गाचा वापर सुरू आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा विचार करून या रस्त्यांची निर्मिती केली. त्यावरुन अवजड वाहने ये जा करतात त्यामुळे या रस्त्याची चाळणी झाली. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर जाणा-या येणा-या वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करून वाहने चालवावी लागत आहे. तर दुचाकीधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे समृद्धी महामार्ग बनेल तो पर्यंत स्थानिक जऊळका ते माळेगाव मार्गाची वाट लागणार आहे.

    रस्त्यांची दुरुस्ती करणार कोण?
    महामार्गाचे काम करणारे कंत्राटदार निघून गेल्यानंतर नादुरुस्त झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोणाची हा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच सध्या नादुरुस्त झालेल्या रस्त्यामुळे दररोज किरकोळ अपघात घडत आहेत. त्यांची जबाबदारी कोण स्विकारणार हा देखील प्रश्न आहेच. तरी संभाव्य अपघात टाळण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी या मार्गाच्या दुरुस्तीबाबत आवाज उठवणे गरजेचे असून संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.