जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देताना अकोल्यातील समतादूत
जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देताना अकोल्यातील समतादूत

  • जिल्हाधिका-यांकडे निवेदनाद्वारे मांडली व्यथा

अकोला (Akola) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुण्याच्या आस्थापनेवरील समतादूतांना ५ महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. ते त्वरित द्यावे, तसेच समतादूतांना बार्टीमध्ये समाविष्ट करुन न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांसाठी अलीकडेच निवेदन सादर करण्यात आले.

संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधूता शिकवण समाजात रुजवणे, अनु. जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधित कायदा १९८९, अंधश्रद्धा निर्मूलन व जाती बंधूता दुर्भावना निर्मूलन या बाबी जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे काम २०१५ पासून समतादूत करीत आहेत. मानधनापासून वंचित राहिल्याने समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच समतादूतांना बार्टीमध्ये वर्ग करुन राजपत्रित अधिका-याच्या नियंत्रणाखाली प्रकल्प कायमस्वरुपी राबवण्यात यावा, समतादूतांचे थकीत मानधन त्वरित द्यावे, समतादूतांना प्रवास खर्च, स्टेशनरी खर्च मंजूर करुन समतादूतांच्या बँक खात्यात रक्कम जमा करावी, मुख्यालयामार्फत कामकाजाच्या नियंत्रणासाठी राज्यात प्रत्येक विभागात एक समन्वयक नेमण्यात यावा, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत ई-कॉमर्स तसेच अन्य बाबींचे पूर्व प्रशिक्षण द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या.

निवेदन सादर करताना वैशाली गवई, प्रज्ञा खंडारे, रविना सोनकुसरे, समता तायडे, मनीष चोटमल, उपेंद्र गावंडे, विनोद शिरसाट, स्मिता राऊत, शुभांगी लव्हाळे उपस्थित होत्या.