'रेमडेसीवीर लस
'रेमडेसीवीर लस

कोरोनाने भारतात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात प्रवेश केल्यावर नंतरच्या काळात म्हणजे मे महिन्यापासून ''संजीवनी बुटी'' सारखे महत्व प्राप्त झालेल्या 'रेमडेसिवीर' या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेनेच (WHO) आता कोरोनावर उपचारासाठी निष्प्रभ ठरविले आहे; त्यामुळे यदाकदाचित कोरोनाची दुसरी लाट आलीच, तर त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे, परंतु त्यामध्ये 'रेमडेसिवीर'ला विशेष महत्वच असणार नाही, हे उल्लेखनीय!

  • 'मेडिकल'मध्ये 'रेमडेसिवीर'चा पुरेसा साठा
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाने खळबळ

अकोला (Akola).  कोरोनाने भारतात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात प्रवेश केल्यावर नंतरच्या काळात म्हणजे मे महिन्यापासून ”संजीवनी बुटी” सारखे महत्व प्राप्त झालेल्या ‘रेमडेसिवीर’ या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेनेच (WHO) आता कोरोनावर उपचारासाठी निष्प्रभ ठरविले आहे; त्यामुळे यदाकदाचित कोरोनाची दुसरी लाट आलीच, तर त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला आहे, परंतु त्यामध्ये ‘रेमडेसिवीर’ला विशेष महत्वच असणार नाही, हे उल्लेखनीय!

कोरोना साथीच्या सुरूवातीपासून जगाचे लक्ष या औषधाकडे वेधले गेले होते. जागतिक पातळीवर अलीकडेच प्रसिद्ध असलेल्या आरोग्यविषयक ‘ब्रिटीश मेडिकल जर्नल’ या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, ‘रेमडेसिवीर’ या औषधाचा वापर कोरोना रूग्णांवर करू नये, अशी स्पष्ट सूचना जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने केली आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये जगभरात हैदोस घातलेल्या कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर गेल्या महिन्यात केलेल्या पाहणीनंतर ही सूचना केली गेली आहे. त्यामुळे अनेक डॉक्टरांनी हे औषध कोरोनावरील उपचारासाठी चांगले असल्याचा केलेला दावा फोल ठरला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने यासाठी एक विशेष पथक नेमून ‘रेमडेसिवीर’ यासह अन्य पाच औषधांवर महिनाभर विविध चाचण्या केल्या. त्यानंतर हाती आलेल्या माहितीनुसार, ‘रेमडेसिवीर’ हे औषध कोरोनावर प्रभावी नसल्याच्या निष्कर्षापर्यंत जागतिक आरोग्य संघटना पोहोचली आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये भारतात या औषधाचा वापर कोरोना संसर्गाची मध्यम तसेच गंभीर लक्षणे आढळत असलेल्या रूग्णांवर मोठ्या प्रमाणावर केला गेला. हे औषध घेतल्याने रूग्णांवर विशेष असे कोणतेही परिणाम दिसून आलेले नाहीत. तसेच यामुळे मृत्यू टाळता येतो असेही दिसून आलेले नाही. त्यामुळे कोरोनासाठी हे औषध आता एकप्रकारे निष्क्रीय ठरले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाचा यासंदर्भातील अहवाल गुरूवार, १९ नोव्हेंबर रोजी ‘ब्रिटीश मेडिकल जर्नल’मध्ये प्रकाशित झाला आहे.

गेल्या सात महिन्यांच्या काळात अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयात (मेडिकल कॉलेज) तसेच विविध हॉटेल्स आणि खासगी रूग्णालयांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या कोरोनासाठीच्या विशेष वॉर्डांमध्ये ‘रेमडेसिवीर’ औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. मध्यंतरी तर याचा तुटवडा निर्माण झाल्याने एकीकडे ‘आयसीयू’मध्ये दाखल कोरोनाबाधितांचा जीव टांगणीला लागला होता तर दुसरीकडे ज्यांच्याकडे हे ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन उपलब्ध होते त्यांनी अव्वाच्या सव्वा दराने त्याची विक्री करून वाहत्या गंगेत आपले हात धुवून घेतले. त्यामुळे खासगी रूग्णालये आणि हॉटेल्स या ठिकाणी केवळ गंभीर रूग्णांवरच या इंजेक्शनचा वापर करण्यात यावा, असे कडक निर्देश देण्याची वेळ जिल्हा शल्य चिकित्सकांवर आली होती.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयात १ एप्रिल ते २० नोव्हेंबर २०२० पर्यंत सुमारे १८५० ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन्सचा वापर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या येथे जवळपास ३५० इंजेक्शन्स उपलब्ध असून, दुसरया संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर हा साठा जतन करून ठेवण्यात आला आहे. बाजारात हे इंजेक्शन सध्या ३ ते साडेतीन हजार रूपये आकारून उपलब्ध करून देण्यात येत आहे. शासनाकडून हे इंजेक्शन शासकीय रूग्णालयांना २१०० रूपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती आहे. खासगी रूग्णालये आणि हॉटेल्सवाल्यांनी मात्र या सात महिन्यांमध्ये ‘रेमडेसिवीर’ च्या माध्यमातून कोरोनाच्या रूग्णांवर चांगलाच हात धुवून घेतला.