लिंकींग करुन विक्री करणा-या खत विक्रेत्यांवर कारवाई करा; जिल्हाधिकारी पापळकर यांचे निर्देश

खरीप हंगामासाठी शेतकरी बियाणे, खतांची खरेदी करतात; परंतु या व्यवहारात विक्रेते ‘लिंकींग’ करुन अनावश्यक खतेही बळजबरीने खरेदी करायला लावतात,त्यामुळे खते खरेदी करताना लिंकींग करुन विक्री केल्याची तक्रार प्राप्त झाल्यास, अशा विक्रेत्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये कारवाई करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

    अकोला (Akola).  खरीप हंगामासाठी शेतकरी बियाणे, खतांची खरेदी करतात. परंतु या व्यवहारात विक्रेते ‘लिंकींग’ करुन अनावश्यक खतेही बळजबरीने खरेदी करायला लावतात,त्यामुळे खते खरेदी करताना लिंकींग करुन विक्री केल्याची तक्रार प्राप्त झाल्यास, अशा विक्रेत्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये कारवाई करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

    यासंदर्भात सोमवारी जिल्हा कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीकांतप्पा खोत, सहा. व्यवस्थापक सचिन कातखेडे, विभागीय व्यवस्थापक महाबीज जगदीशसिंह खोकड, जिल्हा कृषी व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष मोहन सोनवणे, प्रभाकर मानकर, सहायक कामगार आयुक्त राजू गुल्हाने उपस्थित होते.

    जिल्हाधिका-यांनी निर्देश दिले की, शेतक-यांना अनावश्यक खत खरेदी करायला लावू नये. यामुळे शेतक-यांना आर्थिक भार सहन करावा लागतो तसेच अनावश्यक खते जमिनीत गेल्यास जमिनीचे आरोग्यही बिघडते. खत विक्रेत्यांनी लिंकींग करू नये. जिल्ह्यात सध्या जो साठा उपलब्ध आहे, तो जुन्या दरातील आहे. त्यामुळे खतांची विक्री सुद्धा जुन्या दरानेच झाली पाहिजे, याकडे यंत्रणेने लक्ष ठेवावे,असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. तसेच शेतक-यांनी जुन्या दराने खत खरेदी करावी,असे आवाहन ही करण्यात आले.

    घरचे सोयाबीन बियाणे वापरा
    सोयाबीनची लागवड शेतक-यांनी घरच्या बियाण्यातूनच करावी. त्या आधी बियाण्यांची उगवण क्षमता तपासून घ्यावी. जिल्ह्यातील शेतक-यांना हंगामात बियाणे व खतांची टंचाई भासू नये, तसेच त्याची उपलब्धता वेळेवर व्हावी,याबाबत संबंधित यंत्रणांनी दक्ष असावे,असे निर्देशही जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.