जिल्हा सत्र न्यायालय, महाराष्ट्र
जिल्हा सत्र न्यायालय, महाराष्ट्र

  • सोमवारपासून कामकाजाला सुरुवात

अकोला (Akola).  राज्यातील सर्व जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज सोमवारपासून दोन सत्रांमध्ये सुरू होणार आहे. सध्या न्यायालयाचे कामकाज एका सत्रात सुरू आहे; परंतु स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या सोयीनुसार हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे उच्च न्यायालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मर्यादित न्यायाधीश व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत न्यायालयांचे कामकाज सुरू आहे, मात्र सोमवारपासून जिल्हा व सत्र न्यायालयातील मनुष्यबळाची टक्केवारी वाढविण्यात येणार आहे व न्यायालयातील सर्व विभाग सुरू करण्यात येणार आहेत. दोन सत्रात १०० टक्के न्यायाधीशांची उपस्थिती तर न्यायालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्के रोटेशन पद्धतीने राहणार आहे. न्यायाधीशांचे पहिल्या सत्राचे कामकाज सकाळी १०. ३० ते १.३० व दुसऱ्या सत्राचे कामकाज २. ३० ते ५. ३० असे असेल. न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे पहिल्या सत्राचे कामकाज सकाळी दहा ते दुपारी १. ४५ व दुसऱ्या सत्राचे कामकाज दुपारी २ ते ५. ४५ राहणार आहे, मात्र त्यात केवळ महत्त्वाच्या आणि तत्काळ प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. पूर्वीप्रमाणे सर्व खटल्यांचे नियमित कामकाज चालणार नाही. सर्व न्यायाधिशांनी न्यायालयात उपस्थित राहून महत्त्वाच्या प्रकरणाची सुनावणी घ्यावी, जेथे एकच कोर्ट आहे तेथे केवळ सकाळचे एकच सत्र घ्यावे, असे परिपत्रक उच्च न्यायालयाने जारी केले आहे. त्यामुळे गेल्या साडेपाच महिन्यांपासून रेंगाळलेल्या कामकाजाला काहीशा प्रमाणात गती येणार आहे. असे असले तरी न्यायालयात गर्दी होणार नाही, फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करूनच कामकाज होणार आहे.

निकालाच्या जवळ असलेली प्रकरणे चालविण्यात येतील. महिलांचे संरक्षण, घरगुती हिंसाचार अधिनियम, सत्र न्यायालय किंवा विशेष न्यायालय जेथे एक किंवा अधिक आरोपी तीन वर्ष किंवा त्याहून अधिक काळ ताब्यात आहेत अशी प्रकरणे, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण अधिनियम, २०१२, महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण, मनी लॉन्ड्रिंग सारखी प्रकरणे, यासह महत्वाचे फौजदारी खटले चालविण्यात येणार आहेत.