रेमडेसिवीरचा काळाबाजार; मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता

अकोला शहरात रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरूच असून याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींची धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत आरोपींची संख्या 18 वर पोहचल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी स्पष्ट केले.

    अकोला (Akola).  शहरात रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरूच असून याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींची धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत आरोपींची संख्या 18 वर पोहचल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांनी स्पष्ट केले.

    कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरणारे रेमडेसिवीर इंजेक्शन अकोला शहरात 25 हजारात विकण्यात येत होते. याप्रकरणी एलसीबीतर्फे सखोल माहिती घेण्यात येत आहे. आतापर्यंत पकडलेले आरोपी म्हणजे केवळ सुरुवात असून खरे आरोपी अद्याप लांबच असल्याची शहरात चर्चा आहे. वैद्यकीय क्षेत्रातील आणखी काही प्रख्यात व्यक्तींना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सखोल चौकशी केल्यास मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

    आतापर्यंत कामगारांनाच अटक
    रेमडिसीवरच्या प्रकरणात आतापर्यंत मेडिकल किंवा हॉस्पिटल मध्ये काम करणा-या कामगारांनाच अटक करण्यात आली आहे. परंतु पाठबळ असल्याशिवाय अत्यंत कमी पगारात काम करणा-या कामगाराची रेमडेसिवीरचा काळाबाजार करण्याची हिंमत होईल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता खरे आरोपी शोधून काढण्याचे कसब पोलिसांना दाखवावे लागणार आहे.