प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

बाळापूर (Balapur):  अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील बोरवाकडी येथे पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद होऊन सासऱ्याने सुनेच्या पाठीवर गोळी झाडून तिला जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. सोनाली अक्षय क्षीरसागर असे जखमी महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरवाकडी येथे आरोपी मोहन भाऊराव क्षीरसागर व त्याची सून सोनाली अक्षय क्षीरसागर यांच्यात पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वाद झाला. त्यावेळी सासऱ्याने रागाच्या भरात सुनेच्या पाठीत गोळी झाडून जखमी केले. तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सुनेची प्रकृती गंभीर असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून घटनस्थळाचा पंचनामा करीत परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी सोनाली अक्षय क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोहन क्षीरसागर याच्या विरोधात पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.