पर्यावरणास पूरक झाडे लावण्याची गरज; जीवशास्त्रज्ञ प्रा. कुशल सेनाड यांचे आवाहन

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव भलताच वाढला आहे. ऑक्सिजनची देखील भरपूर कमतरता भासत आहे. भविष्यात मोफत आणि भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा आणि सोबतच पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यासाठी एक महत्वाची वृक्ष चळवळ उभारण्याची आणि पर्यावरणास पूरक झाडे लावण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जीवशास्त्रज्ञ प्रा. कुशल सेनाड यांनी केले आहे.

  अकोला (Akola).  महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव भलताच वाढला आहे. ऑक्सिजनची देखील भरपूर कमतरता भासत आहे. भविष्यात मोफत आणि भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा आणि सोबतच पर्यावरणाचे संरक्षण व्हावे यासाठी एक महत्वाची वृक्ष चळवळ उभारण्याची आणि पर्यावरणास पूरक झाडे लावण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जीवशास्त्रज्ञ प्रा. कुशल सेनाड यांनी केले आहे. जेथे कुठे पिंपळ उगवले असतील ते जपा, कडूनिंब आणि चिंचेची झाडेही जपा, रस्त्यांच्या दुतर्फा अशी झाडे लावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

  ते म्हणाले, की स्कन्द पुराणात एक अद्भुत श्लोक आहे.
  अश्वत्थमेकम् पिचुमन्दमेकम्, न्यग्रोधमेकम् दश चिञ्चिणीकान् कपित्थबिल्वाऽऽमलकत्रयञ्च. पञ्चाऽऽम्रमुप्त्वा नरकन्न पश्येत्।।
  (यामध्ये अश्वत्थ म्हणजे पिंपळ, पिचुमन्द म्हणजे कडूनिंब, न्यग्रोध म्हणजे वटवृक्ष, चिञ्चिणी म्हणजे चिंच, कपित्थ म्हणजे कवठ, बिल्व म्हणजे बेल, आमलक म्हणजे आवळा, आम्र म्हणजे आंबा आणि उप्ति म्हणजे झाडे लावणे) जो कोणी या झाडांची लागवड करेल, त्यांची निगा राखेल, त्याला नक्कीच सुदृढ आयुष्य मिळेल कारण झाडांचे संगोपन करताना त्यांच्या सान्निध्याचा फायदाच होईल. हे न अनुसरल्यामुळे आपल्याला दुष्काळ स्वरूपात व रोगराई स्वरूपात नरकाचेच दर्शन घडते आहे.

  पर्यावरणास पूरक झाडांची माहितीही त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, की कडुलिंब वातावरणातील 85% कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेतो. कडुलिंबाचे झाड अनेक औषधी गुणांनी युक्त आहे. हे झाड पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करते. हे एकप्रकारे नॅचरल प्यूरिफायरच आहे. वातावरणातील अशुद्धी साफ करून हवेत ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्याचे काम हे झाड करते. कडुलिंबाचे झाड लावल्याने आसपासच्या हवेतील बॅक्टेरिया नष्ट होतात. जांभळाचे झाड सल्फर आणि नायट्रोजनसारख्या गॅसेसला शुद्ध करते. जांभळाच्या बियाही अतिशय फायदेशीर आहेत. हे झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनही सोडते. वड हा वातावरणातील 80 टक्के कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो. वडाच्या झाडाला नॅशनल ट्री म्हटले जाते.

  वडाचे झाड किती प्रमाणात ऑक्सिजन तयार करते, हे त्याच्या सावलीवर अवलंबून असते. म्हणजेच वडाचे झाड जितके मोठे असेल, तितका जास्त ऑक्सिजन मिळतो. अशोकाचे झाडही मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करून पर्यावरणात सोडते. हे झाड दूषित गॅसही शुद्ध करण्याचे काम करते. अर्जुन वृक्षामुळेही ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळतो, तसेच पर्यावरणातील अशुद्ध वायू शुद्ध करण्याचे काम हे झाड करते. पिंपळ हा वातावरणातील 100% कार्बन डाय-ऑक्साइड शोषून घेतो. पिंपळाचे झाड इतर कोणत्याही झाडाच्या तुलनेत अधिक ऑक्सिजन निर्माण करते. हे झाड 60 ते 80 फुटांपर्यंत लांब असू शकते. येत्या काही वर्षांत प्रत्येक 500 मीटर अंतरावर एक एक पिंपळ आणि वडाचे झाड लावले तर भारत प्रदूषणमुक्त होईल, असेही प्रा. कुशल सेनाड यांनी सांगितले.

  गुलमोहर, निलगिरी, सुबाभूळ ही झाडे आपल्या देशातील पर्यावरणाला घातक आहेत तरी पाश्चात्यांचे अंधानुकरण करून अगदी पर्यावरणाच्या बाबतीत देखील ज्या चुका घडल्या त्या वड, पिंपळ, आंबा, चिंच आदि झाडे लावून पुढच्या पिढीला निरोगी आणि सुजलाम सुफलाम पर्यावरण देण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.