अकोला जिल्ह्यातील परतीच्या पावसाचा सोयाबीन, ज्वारी, कपाशी, केळीच्या बागांना तडाखा
अकोला जिल्ह्यातील परतीच्या पावसाचा सोयाबीन, ज्वारी, कपाशी, केळीच्या बागांना तडाखा

अकोला (Akola) : जिल्ह्यात काल दुपारी तीन वाजताच्या सुमारास झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. रब्बीच्या तयारीला लागलेला शेतकरी वर्ग या नुकसानीमुळे पुरता हवालदिल झाला आहे. शासनाने लवकरात लवकर सर्व्हे करून पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

  • सोयाबीन, ज्वारी, कपाशी, केळीच्या बागांना तडाखा
  • वीज कोसळण्याच्या घटनेत सहा जखमी

अकोला (Akola) : जिल्ह्यात काल दुपारी तीन वाजताच्या सुमारास झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. रब्बीच्या तयारीला लागलेला शेतकरी वर्ग या नुकसानीमुळे पुरता हवालदिल झाला आहे. शासनाने लवकरात लवकर सर्व्हे करून पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

काल दुपारनंतर रात्री उशीरापर्यंत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. या घटनेत जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये वीजा पडून सहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील खांदला येथे विजय दशरथ पिंपळे (47) व सुनील आधार मोहिते (25) हे दोघे शेतात गेले असता वीज कोसळून ते दोन गंभीरपणे भाजले गेले. याशिवाय बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद शिवारात शेळ्या-मेंढ्या चारणाऱ्या गुराख्याच्या झोपडीवर वीज पडून चौघे जखमी झाले. त्यामध्ये संध्या सदाशिव दडस (45), सीमा सदाशिव तडस (18), सपना सदाशिव तडस (19) व प्रवीण सदाशिव तडस (21) यांचा समावेश आहे.  परतीच्या पावसाने शेतकरी वर्गाची चिंता वाढविली आहे. या पावसाने पिकांची पुरती नासाडी झाली आहे. त्याचा सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला आहे.

सध्या सोयाबीन, ज्वारी पिकांची सोंगणीची लगबग सुरू असून, शेतकरी वर्ग कामात गुंतला आहे. परंतु या पावसाने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला आहे. पावसामुळे सोंगणी केलेले सोयाबीन भिजल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अकोट तालुक्यात परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले केळीचे पीक जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह आगमन झालेल्या परतीच्या पावसाचे दोन दिवसांमध्ये हाती येणाऱ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठेवलेले शेतकऱ्यांचे सोयाबीन भिजले आहे.

बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर, महान, एरंडा, परंडा, राजंदा, सिंदखेड आदि भागात झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कपाशीचे नुकसान झाले आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे अगोदरच मूग, उडीदाचे पीक हातून गेले आहे. त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नापासून शेतकरी वंचित झाले आहेत. मूर्तिजापुरातही कालच्या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत ठेवलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले. अकोला तालुक्यातही सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाले. शेतांध्ये पाणी साचल्याने सोयाबीनच्या गंज्यांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन सोंगणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

पातूर तालुक्यातील सोयाबीन पीक परिपक्व झाल्याने सोंगणी, बांधणी करून थ्रेशरमधून काढण्यासाठी शेतक-यांची लगबग सुरू होती. मात्र, परतीच्या पावसाने शेतक-यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतात असलेल्या सोयाबीनला कोंब फुटायला लागले आहेत. शेकडो हेक्टर सोयाबीनचा पेरा करून उत्पन्न वाढण्याची शेतक-यांना अपेक्षा होती. परंतु परतीचा पाऊस अडसर ठरला आहे.

अकोला जिल्ह्यात वीज यंत्रणा विस्कळित
तुफान वाऱ्यासह झालेल्या पावसाचा मोठा फटका महावितरण यंत्रणेला बसला आहे. वादळामुळे 11 केव्हीचे 30 फिडर आणि 33 केव्हीची 5 उपकेंद्रे ब्रेकडाऊनमध्ये गेली होती; पण अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनात सर्व विभागीय कार्यकारी अभियंते व कर्मचाऱ्यांच्या युध्दस्तरावरील प्रयत्नाने ब्रेक डाऊनमधील 18 फिडरचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले आहे. अजूनही 12 फिडर व 33 केव्हीची विझोरा, बार्शिटाकळी, मोहदा, हातरूण आणि मनात्री ही 5 उपकेंद्रे ब्रेकडाऊनमध्येच आहेत. कृषी फिडर वगळता शहर व गावठाण फिडरचा वीज पुरवठा पूर्ववत करण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे.