कोरोनाबाबतचा निष्काळजीपणा भोवणार, बाधित रुग्णांचा चढता आलेख चिंताजनक

काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा सावध राहून व्यवहार करण्याची गरज आहे. कारण रुग्णांचा आलेख असाच वाढू लागला तर निष्काळजीपणा भोवल्याशिवाय राहणार नाही, हे वास्तव पुन्हा उजागर झाले आहे. रविवारी, जिल्ह्यात ४५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. १०९४ प्राप्त अहवालातून हे रुग्ण आढळले. शनिवारी जिल्ह्यातील ११ शिक्षक पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

अकोला (Akola).  काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा सावध राहून व्यवहार करण्याची गरज आहे. कारण रुग्णांचा आलेख असाच वाढू लागला तर निष्काळजीपणा भोवल्याशिवाय राहणार नाही, हे वास्तव पुन्हा उजागर झाले आहे. रविवारी, जिल्ह्यात ४५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. १०९४ प्राप्त अहवालातून हे रुग्ण आढळले. शनिवारी जिल्ह्यातील ११ शिक्षक पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

४५ रुग्णांममध्ये १३ महिला आणि ३२ पुरुषांचा समावेश आहे. त्यात मूर्तिजापूर येथील १३ जण, जीएमसी व जुनेशहरातील प्रत्येकी तीन जण, डाबकी रोड, तापडियानगर, दहातोंडा ता. मूर्तिजापूर, जठारपेठ व एसबीआय कॉलनी येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित भीमनगर, कुंभारी, मोठी उमरी, वाडेगाव ता. बाळापूर, बाळापूर, कान्हेरी गवळी ता. बाळापूर, दीपक चौक, मयूर कॉलनी, मुकुंदनगर, मिलिंदनगर, लहान उमरी, तथागत नगर, मलकापूर, तळेगाव ता. तेल्हारा, जुने खेताननगर व दानापूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ९०१२ झाली असून २८८ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ८२१७ रुग्णांची प्रकृती सुधारल्याने त्यांना सुटी देण्यात आली. अॅक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्ण ५०७ झाले आहेत.

शाळा सुरू होण्यापूर्वी ११ शिक्षक पॉझिटिव्ह
एकीकडे शाळा सुरू करण्याविषयी प्रशासनाकडून पावले उचलली जात असताना अकोल्यात शनिवारच्या चाचण्यांतून जिल्ह्यातील ११ शिक्षक पॉझिटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली. १४६ अॅन्टीजन टेस्ट करण्यात आल्या.
बार्शीटाकळी येथे सहा चाचण्यातून दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, वैद्यकीय महाविद्यालयात ७८ चाचण्यापैकी आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर हेडगेवार लॅब येथे १३ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे ११ जण पॉझिटीव्ह आढळले,असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

मूर्तिजापूर तालुक्यात वाढते रुग्ण
२२ नोव्हेंबरच्या अहवालात मूर्तिजापूर तालुक्यातील १४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. शहर विभागातील १३ तर दहातोंडा येथील एका रुग्णाचा त्यात समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील लोकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली
दिवाळीपूर्वी अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २००-२५० च्या आसपास होता. त्यामुळे प्रशासनाकडून देखील समाधान व्यक्त होत होते परंतु आता पुन्हा बाधित रुग्ण मोठ्या संख्येत आढळत आहेत. ही चिंतेची बाब आहे. लोक कोरोना निघून गेल्यागत व्यवहार करताना दिसत आहेत. त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. मास्क शिवाय बाहेर पडू नये, सॅनिटायझरचा वापर करावा, तसेच सार्वजनिक स्थळी गर्दी होणार नाही याबाबत दक्ष राहण्याची नितांत गरज आहे. थोडीशी ढिलाई गंभीर रुप धारण करू शकते, याची जाणीव ठेवावी याकडे नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे.