प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

  • पोलिसांचे तपासकार्य सुरु

मूर्तिजापूर (जि.अकोला) (Murtijapur).   अमरावती जिल्ह्यातील दोन महिला तालुक्यातील ग्राम येथील येथे देवदर्शनाला आल्या असता मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास पूर्णा नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली. या दोघी मायलेकी असल्याचे समजते. दरम्यान, त्यापैकी एका ६० वर्षीय महिलेचा अर्थात मातेचा मृतदेह सकाळी १० वाजता वाहून येत असताना पाहून गावकऱ्यांनी पकडून काठावर आणला. बुडालेल्या मुलीचा शोध घेणे सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अमरावती जिल्ह्यातील एक कुटुंब दुर्गवाडा येथील मुखोर्जी महाराज मंदिरात सोमवार, २११ सप्टेंबर रोजी दाखल झाले. दिवसभर पाऊस सुरू असल्याने त्यांना गावी परत जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे विमल मनोहर अंभोरे, रा. रेवसा (वलगाव), सारिका प्रदीप मोहोड, प्रदीप मोहोड, बेबी मोहोड– सर्व राहणार रा. जामठी ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती यांनी रात्री मंदिरातच मुक्काम केला. यातील विमल मनोहर अंभोरे (६०) रा. रेवसा व सारिका प्रदीप मोहोड (३४) रा. जामठी ता. नांदगाव खंडेश्वर या दोघी मायलेकी सकाळी ६ वाजताच्या सुमारास नदीकाठावर प्रात:विधीसाठी गेल्या असता पूर्णा नदीला अकस्मात आलेल्या पुरात दोघीही वाहून गेल्या.

संततधार पावसामुळे पूर्णा नदी दुथडी भरून वाहत असल्याने लाखपुरी येथील काहीजण मंगळवारी सकाळीच पूर पाहण्यासाठी आले होते. त्याचवेळी काही पट्टीचे पोहणारे पुरात डुंबण्याचा आनंद घेत असताना वृद्ध महिलेचा मृतदेह त्यांना वाहात येताना दिसला. पोहणाऱ्यांनी हा मृतदेह नदीकाठावर आणला. पोलिस पाटील डिगांबर नाचणे यांनी ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर हेड कॉन्स्टेबल सुभाष उघडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनील नवलाखे, हेड कॉन्स्टेबल शिवानंद मोहोड, आय बाईक पथकाचे नायक पोलिस शिपाई संतोष गवई, प्रवीण वाकोडे हे सहकारयांसह घटनास्थळी पोहोचले. चौकशी दरम्यान दुर्गवाडा येथून दोन महिला पुरात वाहून गेल्याचे निष्पन्न झाले. पुरात मिळून आलेला मृतदेह हा विमल मनोहर अंभोरे या महिलेचा असून सारिका प्रदीप मोहोड या महिलेचा शोध घेणे सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.