‘या’ प्रोजेक्ट अंतर्गत प्लाझ्मा डोनरला मिळणार दोन हजार रुपये

प्लाझ्मा थेरपीला चालना देण्यासाठी जुलै महिन्यात नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे प्रोजेक्ट प्लॅटीना सुरू करण्यात आला आहे. पूर्वी केवळ ५०० रुपयांची तरतूद होती; परंतु कित्येक दात्यांना ही रक्कम मिळालीच नव्हती. यासाठी आता राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना निधी वितरित करण्यात आला असून, तसे परिपत्रक १७ ऑगस्ट रोजी काढण्यात आले आहे.

अकोला : कोरोना रूग्णावर मात करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी (Plasma therapy)अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे या उपचार पद्धतीसाठी प्लाझ्मा दान करणाऱ्या प्रत्येक डोनरला प्लॅटिना प्रोजेक्ट (Platina Project ) अंतर्गत दोन हजार रूपये देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास २० दात्यांचा निधी प्राप्त झाला आहे. आतापर्यंत अकोल्यात १५ जणांनी प्लाझ्मा दान केला असून, त्यांना लवकरच प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार आहे.

प्लाझ्मा थेरपीला चालना देण्यासाठी जुलै महिन्यात नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे प्रोजेक्ट प्लॅटीना सुरू करण्यात आला आहे. पूर्वी केवळ ५०० रुपयांची तरतूद होती; परंतु कित्येक दात्यांना ही रक्कम मिळालीच नव्हती. यासाठी आता राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना निधी वितरित करण्यात आला असून, तसे परिपत्रक १७ ऑगस्ट रोजी काढण्यात आले आहे.

अकोला जीएमसीमध्ये आतापर्यंत १५ जणांकडून प्लाझ्मा संकलीत करण्यात आला आहे; परंतु यापैकी कोणालाही प्रोत्साहनपर दोन हजार रुपये प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे आता परिपत्रक जारी झाल्यानंतर शासनाकडून या १५ जणांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच प्लॅटिना प्रोजेक्ट अंतर्गत १९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २७३ रक्तदात्यांनी प्लाझ्मा दान केला असून २३ ऑगस्टपर्यंत या रक्तदात्यांनी ७७५ युनिट प्लाझ्मा दान केल्याची नोंद करण्यात आली आहे.