कारवाई : नियमांचे उल्लंघन करणे भोवले ! सूर्यचंद्र हॉस्पिटलला बजावली नोटीस

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील सूर्यचंद्र हॉस्पिटलला रजिस्ट्रेशन रद्द करण्यासंदर्भात मनपा आयुक्तांनी नोटीस बजावल्यामुळे खळबळ उडाली आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये गांधी चौक येथे असलेल्या सूर्यचंद्र ट्रामा केअर अँड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी 31 मार्च रोजी Bombay Nursing Homes Registration Act, 1949 च्या नियम 9 नुसार भेट देऊन पाहणी केली.

    अकोला (Akola).  नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील सूर्यचंद्र हॉस्पिटलला रजिस्ट्रेशन रद्द करण्यासंदर्भात मनपा आयुक्तांनी नोटीस बजावल्यामुळे खळबळ उडाली आहे. अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये गांधी चौक येथे असलेल्या सूर्यचंद्र ट्रामा केअर अँड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी 31 मार्च रोजी Bombay Nursing Homes Registration Act, 1949 च्या नियम 9 नुसार भेट देऊन पाहणी केली. यावेळी रुग्णालयात कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णासोबतच एका कक्षात नॉन कोविड रुग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार केला जात असल्याचे निर्दशनास आले होते.

    सदरची बाब नियमांचे उल्लंघन करणारी असून, नॉन कोविड रुग्णांच्या आरोग्यास व जीवितास हानी पोहोचविणारी होती. तसेच सूर्यचंद्र रुग्णालयात अत्यंत अस्वच्छता आढळून आली होती. तेथे वापरलेल्या पीपीई किट व इतर बायोमेडिकल वेस्ट रुग्णालयातील पायऱ्यांमध्ये ठेवण्यात आले होते. हे सर्व साहित्य नियमाचे उल्लंघन करून इतरांच्या आरोग्यास व जीवितास धोका पोहोचेल अशा स्थितीत ठेवल्याचे दिसून आले. सूर्यचंद्र रुग्णालय हे नियमांचे पालन करीत नसल्याचे यावरून स्पष्ट होते. रुग्णालयात आयसीयुमध्ये रुग्ण भरती असतानाही कोणीही डॉक्टर्स रुग्णांच्या उपचाराकरिता हजर नव्हते. रुग्णालयातील व्यवस्थापकांच्या भरवशावर रुग्णालय सोडले होते.

    कार्यरत व्यवस्थापकांनी डॉक्टरांना संपर्क साधून हजर राहण्याची विनंती करूनही तपासणी चमू समक्ष जवळपास अर्धा तास वाट पाहूनही कोणतेही डॉक्टर हजर झाले नाही. त्यामुळे रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांची कोणतीही काळजी रुग्णालयाकडून घेण्यात येत नसल्याचे उलट रुग्णाच्या जीवाशी खेळ होत असल्याचे आढळून आले. सूर्यचंद्र रुग्णालयातील बिले तपासली असता रुग्णांना नियमांव्यतिरिक्त बिले देऊन त्यांच्याकडून भरपूर रक्कम आकारण्यात येत असल्याचे सुध्दा आढळून आले.

    त्यामुळे सूर्यचंद्र रुग्णालयाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा भंग केला आहे. यासंदर्भात 31 मार्च 2021 रोजी त्यांना दिलेल्या नोटीसचे उत्तरही रुग्णालय प्रशासनाने असमाधानकारकरित्या सादर केले आहे. त्यामुळे मनपा आयुक्त निमा अरोरा यांच्या आदेशान्वये 10 एप्रिल रोजी सूर्यचंद्र रुग्णालयाला Bombay Nursing Homes Registration Act, 1949 अन्वये एक महिन्याच्या आत या सर्व त्रुटींची पूर्तता करण्याकरिता नोटीस देण्यात आली आहे. सदर त्रुटी पूर्ण करण्यास ते असमर्थ ठरल्यास Bombay Nursing Homes अॅक्टनुसार त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे.