पातूर तालुक्याचा पाणीटंचाई कृती आराखडा: ६७ गावांचा समावेश

पातूर तालुक्यातील पाणीटंचाईचा कृती आराखडा जाहीर करण्यात आला असून, यामध्ये 67 गावांचा समावेश करण्यात आला आहे. तालुक्यात एकूण 95 गावांचा समावेश असून, 57 ग्रामपंचायती आहेत.

    पातूर (Patur).  तालुक्यातील पाणीटंचाईचा कृती आराखडा जाहीर करण्यात आला असून, यामध्ये 67 गावांचा समावेश करण्यात आला आहे. तालुक्यात एकूण 95 गावांचा समावेश असून, 57 ग्रामपंचायती आहेत. तर 95 गावांपैकी 67 गावांचा समावेश पाणीटंचाई कृती आराखडा 2021 मध्ये करण्यात आला आहे.

    कृती आराखड्यामध्ये प्रामुख्याने विहीर स्रोत गाळ काढणे, विहिरी अधिग्रहण करणे, टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, प्रगतीपथावरील नळ योजना पूर्ण करणे, नळ योजनेमध्ये विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, विंधन विहीर विशेष दुरुस्ती, हातपंप, विहीर पंप, नवीन विंधन विहीर विशेष दुरुस्ती, नवीन सिंचन विहीर दुरुस्ती यामध्ये हातपंप, विहीर पंप, नवीन विंधन विहीर, कूपनलिका आदि उपाययोजनांचा समावेश आहे. 67 गावांसाठी पाणीटंचाई निवारणासाठी 139. 51 लाखाच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

    माहे जानेवारी ते मार्च 2021 पर्यंत 67 गावांपैकी पातूर तालुक्यातील 47 गावे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यावर 84.20 लाखाच्या खर्चाची तरतूद करण्यात आली तर एप्रिल ते जून 2021 उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये पातूर तालुक्यातील बेलुरा खुर्द, बेलुरा बुद्रुक, खामखेड, उमरा, पांगरा, दिग्रस, सावरगाव, जांब, झरंडी, कारला, मलकापूर, भानोस, आस्टूल, सुकळी, दिग्रस खुर्द, हिंगणा, तांदळी खुर्द, आसोला, पळसखेड आदि गावांचा समावेश आहे. गावामध्ये नळ योजना 4 हात पंप, विद्युत पंप 8, सार्वजनिक विहिरी 28, खाजगी विहिरी 23 आरणि 14 विहिरी अधिग्रहीत करून 6 विहीरी खोल करणे, त्यातील गाळ काढणे या उपाययोजनांचा त्यामध्ये समावेश आहे.

    मलकापूर, भानोस, आस्टूलमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. 5 नवीन विंधन विहिरी असून, यासाठी 55.31 लाखांचया खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. 20 गावांमध्ये 29 उपाय योजना राबविण्यात येत आहेत. उन्हाळ्यामध्ये एप्रिल ते जून 2021 पर्यंत 20 गावे पाणी टंचाईसाठी प्रस्तावित केली असली तरी या वर्षी उन्हाचा वाढता पारा पाहता पातूर तालुक्यातील अन्य गावांमध्येही उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    वाढत्या उन्हामुळे हातपंपाच्या पाण्याची खोली, विहिरीच्या पाण्याची पातळी तसेच धरणाची पातळी खोल जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु वेळेवर आणखी काही गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्यास प्रशासनाजवळ यावर कोणताही उपाय नसून आणखी काही गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यास प्रशासनाची तारांबळ उडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.