प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

  • मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प

अकोला (Akola) : कोरोनाच्या काळातही आपले कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने त्यांनी १ ऑक्टोबरपासून लेखणी बंद (कामबंद) आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प पडले आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

देशभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी मंदी आली आहे. महामारीच्या भीतीने मजूर घरी परतले आहेत. तयार प्रॉपर्टी जसे फ्लॅट, दुकान, बंगले, ड्युप्लेक्स आदींची विक्री थांबली आहे. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. आधीपासूनच गर्तेत अडकलेल्या बांधकाम व्यवसायाला कोरोनाने अधिक संकटात टाकले आहे. तज्ज्ञांच्या मते, हा व्यवसाय कोरोनाच्या आधीपासूनच संकटात होता. या स्थितीतून बाहेर निघण्यासाठी किमान वर्ष दोन वर्षे लागणार असल्याचे मत बिल्डरांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, या स्थितीतून रिअर इस्टेट क्षेत्राला उभारी देण्यासाठी शासनाने विक्री करारनामा व अभिहस्तांतरण प्रकारच्या दस्त्यांवर व मुद्रांक शुल्कात अनुक्रमे तीन व दोन टक्के सवलत लागू केली आहे.

त्यासोबतच रेडीरेकनरच्या दरात (वार्षिक बाजार मूल्य) सुद्धा अल्पवाढ केली आहे. त्यामुळे कोरोना काळात सुद्धा शासनाच्या तिजोरीत चांगला महसूल जमा होत आहे. परंतु या काळात आपले आरोग्य धोक्यात टाकून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर होत नसल्याने त्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत.