१ वर्षांचे मानधन दिले सी.एम. फंडात; वाडेगावचे सरपंच दोड यांचा पुढाकार

कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून कोरोना रुग्णांना अधिक प्रमाणात सुविधा मिळाव्यात यासाठी दानशुरांचे हात पुढे येत आहेत. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वाडेगावचे सरपंच सुधाकरराव दोड यांनी त्यांना मिळालेला सरपंच पदाचे एक वर्षाच्या मानधनाचा धनादेश नायब तहसीलदार देवानंद ढबाले यांना सुपूर्द केला.

    वरूड (Warud).  कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले असून कोरोना रुग्णांना अधिक प्रमाणात सुविधा मिळाव्यात यासाठी दानशुरांचे हात पुढे येत आहेत. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वाडेगावचे सरपंच सुधाकरराव दोड यांनी त्यांना मिळालेला सरपंच पदाचे एक वर्षाच्या मानधनाचा धनादेश नायब तहसीलदार देवानंद ढबाले यांना सुपूर्द केला.

    दोड यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल नायब तहसीलदार ढबाले यांनी गौरवोद्गार काढून स्वागत केले. महाराष्ट्रात कोरोनाने आपली पाळेमुळे सर्वत्र पसरविली आहे. रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यांना सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी प्रत्येकाने महाराष्ट्रावर आलेल्या संकटाचा सामना एकत्रितपणे लढून केला पाहिजे.

    मुख्यमंत्री सहायता निधीला मदत पाठवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन यावेळी दोड यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असलेले सुधाकर दोड हे तिसऱ्यांदा वाडेगावचे सरपंच झाले आहेत. त्यांनी आपल्याला मिळत असलेले एक वर्षाचे मानधन 11 हजार रु. मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहे. धनादेश देतेवेळी वाडेगावचे ग्रामसेवक राजेश भडांगे उपस्थित होते. असे करणारे हे जिल्ह्यातील पहिलेच सरपंच असल्याने त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.