मानेवर चाकू ठेवून १४ लाखांचा दरोडा, अमरावती जिल्हा पोलिस प्रशासन खडबडून जागे

कुऱ्हा पोलीस ठाण्याचे ठाणेदार ईश्वर वर्गे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून डॉग्सकोट पथकाकडून परिसर पिंजून काढला मात्र अजूनपर्यंत कुठलाही सुगावा लागला नाही, अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून .....

    तिवसा (Tivasa) : तालुक्यातील कुऱ्हा पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मारडा येथील एक घरात पाच ते सहा चोरटयांनी मागच्या दारातून प्रवेश करत घरातील लोकांच्या मानेवर चाकू ठेवून रोख रक्कम, सोने (Gold) ,चांदी (Silver), असा मुद्देमाल चोरी झाल्याची घटना मध्यरात्री 1:15च्या दरम्यान घडली आहे. सकाळी सर्व घटना उघडकीड येताच परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती; दरम्यान पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरटयांचा शोध घेतला जातो आहे.

    येथील रमेश गोविंदराव साव यांचे घर अगदीच कुऱ्हा ते आर्वी जाणाऱ्या मार्गा लागत असून काल त्यांच्या घराला अज्ञात चोरटयांनी लक्ष केले, घरात पत्नी, मुलगा, सून गाढ झोपेत असताना रात्री 1:15 वाजता दरम्यान चोरटयांनी मागील दाराची काळी तोडून घरात शिरले व चाकूचा धाक दाखवून बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील सोने, चांदी व रोख रक्कम असा एकूण 13 लाख 90 हजार रुपयावर चोरटयांनी हात साफ केला. शहरासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून चोरट्यांचा चांगलाच धुमाकूळ सुरु आहे.

    साव यांच्या घरात घडलेल्या दरोड्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच कुऱ्हा पोलीस ठाण्याचे ठाणेदार ईश्वर वर्गे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून डॉग्सकोट पथकाकडून परिसर पिंजून काढला मात्र अजूनपर्यंत कुठलाही सुगावा लागला नाही, अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनांत सुरु आहे.

    या भागातील सर्वात मोठा दरोडा असल्याने गावात चांगलीच खळबळ उडाली आहे याप्रकरणी पोलिसांकडून सर्व बाबी तपासल्या जात आहे कुऱ्हा, आर्वी मार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपवरील सीसीटीव्ही फुटेज, तर घरातील लोकांकडून चोरट्यांचे वर्णनांच्या आधारे सर्व चोरट्यांचा शोध घेतला जातो आहे.