रिद्धपूर बसस्थानकावर पुन्हा अपघात; दोन गंभीर जखमी रुग्णालयात दाखल

कारचालक धडक मारल्यानंतर चांदूरबाजारच्या दिशेने पळून गेला. दरम्यान कंट्रोल रूम व चांदूरबाजार पोलिस स्टेशनला तसेच चांदूरच्या कार्यकर्त्यांना स्थानिकांनी सूचना दिली.

    रिद्धपूर. अपघात प्रवणस्थळ ठरलेल्या रिद्धपूर बसस्थानकावर दोन महिन्यातच सहावा अपघात झाला असून या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना चांदूरबाजार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने जखमींना अमरावती येथे रवाना करण्यात आले आहे.

    मंगळवारी (23 मार्च) रात्री 9.30 वाजता नागपूरवरून भरधाव येणारी स्विफ्ट कार क्र. एम. एच. 49/ यु 1365 ने एम. एच. 27/ डी.4785 क्रमांकाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक बसताच दुचाकीवरील दाम्पत्य 10 फूट दूर फेकल्या गेले. तर दुचाकी फरफटत सुमारे दीडशे फूट अंतरावर फेकल्या गेली. सुदैवाने रात्रीचे लॉकडाऊन असल्याने रस्ता निर्मनुष्य होता. अन्यथा या अपघातात अधिक हानी झाली असती. रिद्धपूर येथील नातलगांकडे कौटुंबीक कार्यक्रमासाठी चांदूरबाजार तालुक्यातील निमखेड येथील रहिवासी रिझवान हुसेन मंजूर हुसेन सपत्नीक आले होते. रात्री जेवण आटोपून गावाकडे जात असताना ही घटना घडली.

    कारचालक धडक मारल्यानंतर चांदूरबाजारच्या दिशेने पळून गेला. दरम्यान कंट्रोल रूम व चांदूरबाजार पोलिस स्टेशनला तसेच चांदूरच्या कार्यकर्त्यांना स्थानिकांनी सूचना दिली. नागरिक व चांदूर पोलिस यांच्या समयसूचकतेने साई मंदिराजवळ कारसह चालकाला पकडण्यात आले. रात्री 11 वा. शिरखेड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.

    अपघाताची श्रुंखला व यंत्रणेची बेफिकिरी

    गत दोन महिन्यात 100 मीटरच्या परिसरात तब्बल प्रमुख सहा अपघातांसह किरकोळ बरेच अपघात झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील श्रीक्षेत्र रिद्धपूर येथील बसस्थानक परिसरात नेहमीच वाहतूक व प्रवाशांची वर्दळ असते. येथून भरधाव धावणाऱ्या वाहनांमुळे तथा अरूंद रस्त्यामुळे नेहमीच अपघाताची स्थिती उद्भवत असते. अशी सहा स्थळे आहेत. त्या ठिकाणी वेगप्रतिबंधक तातडीने बसविणे आवश्यक झाले आहे. लेहेगाव फाटा (लालाची विहीर), जिप. मराठी शाळा (आष्ट्रोली फाटा), पोहोकार यांचे कृषिकेंद्र, कॉलनी रोड फाटा, गोविंद प्रभू राजमठ प्रवेशद्वार(जालनापूर फाटा), आणि आश्रमशाळा व पेट्रोल पंप ही येथील अपघातप्रवण स्थळे असून या सर्व ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविणे आवश्यक आहे. अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.