amravati university

विद्यापीठाचे सर्वात महत्वाचे प्राधिकरण असलेल्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नामित सदस्य म्हणून प्रा. दिनेश सूर्यवंशी यांची वर्णी लागली होती. मात्र, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच अपात्र होण्याची नामुष्की ओढावली आहे.

  • राज्यपाल नामित सदस्य व्यवस्थापन परिषदेतून अपात्र

अमरावती. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नामित सदस्य प्रा. दिनेश सूर्यवंशी यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्याकडून ही अपात्र ठरविण्याची कारवाई सोमवारी (२६ ऑक्टोंबर) करण्यात आली. व्यवस्थापनाच्या २२ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या ठरावाचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राज्यपाल नामित सदस्यास अश्याप्रकारे अपात्र ठरविण्याची कारवाई करण्यात आल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

विद्यापीठाचे सर्वात महत्वाचे प्राधिकरण असलेल्या व्यवस्थापन परिषदेवर राज्यपाल नामित सदस्य म्हणून प्रा. दिनेश सूर्यवंशी यांची वर्णी लागली होती. मात्र, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच अपात्र होण्याची नामुष्की ओढावली आहे. चौकशी समितीचे अध्यक्ष असताना अहवाल सादर न करणे तसेच ऑनलाइन परीक्षेबाबत पत्रपरिषद घेतल्याने त्यांची सदस्यता रद्द करण्यात आली.

कोरोना संक्रमणामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षेचा घोळ सर्वत्र सुरू आहे. असाच गोंधळ संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात देखील झाला. ऑनलाइन परीक्षा घेण्यास विद्यापीठास अपयश आले. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने विद्वत परिषद, परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार महाविद्यालयीन स्तरावर परीक्षा घेण्याचे नियोजन केले. महाविद्यालयाने झालेल्या अभ्यासक्रमाच्या आधारे प्रश्नपत्रिका तयार करुन विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांचे गुण विद्यापीठ परीक्षा विभागाला पाठवावे लागणार आहे. त्यानंतर परीक्षा विभागाकडून निकाल घोषित केला जाणार आहे. विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयाचा प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी जाहिर विरोध केला होता. ऐवढेच नव्हे तर पत्रपरिषद घेत कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्यावर गंभीर आरोप देखील केले होते. विद्यापीठाच्या प्राधिकरणावर असताना विरोधात भूमिका घेणे प्रा. सूर्यवंशी यांना चांगलेच महागात पडले.

कलम ६४ नुसार कारवाई
प्राधिकरणाचे सदस्य असताना विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाचा जाहिरपणे विरोध केल्याने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा कलम ६४ अन्वये प्रा. दिनेश सूर्यवंशी यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. प्रा. सूर्यवंशी यांना व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणून अपात्र ठरविण्यात आले असून लवकरच नोटीफिकेशन काढणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी दिली.

अपात्रेला आव्हान देणार

अपात्र घोषित करण्यात आलेले दोन्ही कारण मला लागू होत नाही. कलगुरूंनी अत्यंत असंवैधानिक तसेच बेकायदेशीर मार्गाने अपात्र ठरविले आहे. गत २५ ते ३० वर्षांपासून विद्यापीठ, विद्यार्थ्यांच्या हिताकरिता सक्रीय कार्य करीत आहे. एका चौकशी समितीचा अध्यक्ष असल्याने अहवाल सादर न केल्याचे एक कारण दर्शविण्यात आले आहे. तर दुसरे कारण दोन ते तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या हिताला घेऊन परीक्षेबाबत सुरू असलेली चर्चा ही आहे. या दोन कारणाने अपात्र घोषित करणे निषेधात्मक आहे. कुलगुरूंच्या खुर्चीला धोका निर्माण झाल्याने त्यांनी पदाचा दुरूपयोग केला आहे. या अपात्रतेला योग्य ठिकाणी आव्हान देणार आहे.

प्रा. दिनेश सूर्यवंशी, व्यवस्थापन परिषद सदस्य संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ

यापूर्वी दिल्या नोटीस

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची प्रतिमा प्रा. दिनेश सूर्यवंशी हे सार्वजनिकरित्या मलीन करण्याचा प्रयत्न करीत आहे. या पूर्वी त्यांना दोन वेळा नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. ऑनलाइन परीक्षेचे संचालन करीत असताना त्यांनी सर्व सीमा पार केल्या. विद्यापीठ नियमानुसार परीक्षा घेत होते. मुंबईसहित अन्य विद्यापीठांनी देखील महाविद्यालय स्तरावर परीक्षा घेतल्या आहेत.

डॉ. मुरलीधर चांदेकर, कुलगुरू संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ