शौचालय घोटाळा प्रकरण : महापालिकेचे तत्कालीन लेखाधिकारी प्रेमदास राठोड यांना अटक

अमरावती महापालिकेत झालेल्या वैयक्तिक शौचालय घोटाळाप्रकरणी महापालिकेचे तत्कालीन मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड यांना आर्थीक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली. त्यानंतर त्यांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसाचा पीसीआर सुनावला आहे.

    अमरावती (Amravati).  महापालिकेत झालेल्या वैयक्तिक शौचालय घोटाळाप्रकरणी महापालिकेचे तत्कालीन मुख्य लेखाधिकारी प्रेमदास राठोड यांना आर्थीक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली. त्यानंतर त्यांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना चार दिवसाचा पीसीआर सुनावला आहे.

    महापालिकेच्या बडनेरा झोनअंतर्गत वैयक्तिक शौचालय योजनेत 2 कोटी 49 लाखांचा अपहार झाल्याचे जून 2020 मध्ये उघडकीस आले होते. त्यामध्ये कंत्राटी कर्मचारी संदीप राईकवर, महापालिकेच्या आस्थापनेवरील अनुप सारवान व ‘ज्ञानपुष्प’ नामक संस्थेचा अध्यक्ष योगेश कावरे याच्यासह आणखीन सहा जणांना या पुर्वीची आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. आता एकूण शौचालया घोटाळ्यातील आरोपींची संख्या 10 झाली आहे.

    हलगर्जी व अनियमीतेचा ठपका ठेवत आर्थिक गुन्हे शाखेने तपासदरम्यान राठोंड यांच्यावर ठेवला आहे. तत्कालीन लेखाधिकारी म्हणून राठोड याची जबाबदारी अधिक असल्याने या प्रकरणात त्यांची चौकशी सुरु होती. उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यामुळे राठोड यांनी मंगळवारी जिल्हा न्यायालयात आत्मसमर्पण केले. न्यायालयाच्या आदेशानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना न्यायालयीन कोठडीतून ताब्यात घेवून अटक केली. या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी म्हणून राठोड याला अटक झाल्यामुळे या प्रकरणात आणखीन कुणाकुणाचा सहभाग आहे हे तपासात समोर येणार आहे.

    तत्कालीन मुख्यलेखाधिकारी याला अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात दहा आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. या प्रकरणी आणखीन धागेदोरे हाती लागणार आहे. -- शिवाजी बचाटे, पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा