अमरावती जिल्ह्यात रेतीची चोरटी वाहतूक करणारे कारवाई दरम्यान ट्रक घेऊन पसार

रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांना मंडळ अधिकारी यांनी मार्डी रोडवरील खंडेलवाल पेट्रोल पंपासमोर पकडले. परंतु कारवाईदरम्यान तिन्ही वाहनांचे चालक ट्रक व पिकअप वाहन घेऊन पसार झाले.

  • मार्डी रोड स्थित खंडेलवाल पेट्रोल पंपासमोरील घटना

(वैभव बाबरेकर)
अमरावती (Amravati).  रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांना मंडळ अधिकारी यांनी मार्डी रोडवरील खंडेलवाल पेट्रोल पंपासमोर पकडले. परंतु कारवाईदरम्यान तिन्ही वाहनांचे चालक ट्रक व पिकअप वाहन घेऊन पसार झाले. या घटनेची तक्रार मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर गोविंद गावनेर (52 रा. नवसारी) यांनी फ्रेजरपुरा पोलिसात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी तीन्ही वाहनाच्या चालकाविरुध्द गुन्हा नोंदविला.

रायल्टी व परवाना नसताना चोरटी वाहतूक तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर गावनेर यांचे पथक मार्डी रोडवरील गौण खनिज वाहतुकीसंदर्भात कारवाईसाठी गेले होते. दरम्यान पथकाने ट्रक क्रमांक सीजी 07 सी 8848, एमएच 34 एम 6013 व एमएच 27 बीई 5954 या वाहनातून रेतीची वाहतुक होत असल्याचे आढळून आले. तहसिलच्या पथकाने तिन्ही वाहनांना थांबवून रायल्टी व परवान्याविषयी चौकशी केली.

परंतु ते विना रायल्टी व विना परवान्याने रेतीची चोरटी वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. तहसिलचे पथक तिन्ही वाहनांवर कारवाई करीत असताना, एका ट्रक चालकाने अन्य चालकांना इशारा करून ट्रक पळून नेण्यास सांगितले. त्यामुळे तिन्ही चालकांनी वाहन घेऊन पसार झाले. हा प्रकार पाहून मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर गावनेर यांनी या घटनेची तक्रार फ्रेजरपुरा पोलिसात नोंदविली.