अमरावती विद्यापीठ घेणार लेखी परीक्षा; इतर विद्यापीठांचा ऑनलाईन पद्धतीवर शिक्कामोर्तब

  • राज्यात विद्यापीठांनी सादर केला अहवाल
  • अंतिम वर्षाची परीक्षा तीन तासांऐवजी एक तासाची

अमरावती. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन परीक्षा (Online exam) घेण्याबाबत सर्व विद्यापीठांचे (University) एकमत झाले असले तरी अमरावती विद्यापीठ (Amravati University) मात्र पारंपरिक पद्धतीनेच परीक्षा घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अर्थात अभियांत्रिकी आणि तांत्रिक अभ्यासक्रमाचाच यात समावेश आहे. दरम्यान राज्याच्या १३ विद्यापीठांमध्ये ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा घेण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सर्व विद्यापीठांनी आपण परीक्षा कशी घेणार याचा अहवाल राज्य उच्च शिक्षण संचालकांकडे सादर केला आहे.  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानेसुद्धा या बाबतचा अहवाल सादर केला असून, यात यात अभियांत्रिकी आणि तांत्रिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा पारंपरिक लेखी स्वरूपातच घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. इतर अभ्यासक्रमाच्या परीक्षा या ऑनलाईन बहुविकल्प पद्धतीच्या असतील असेही विद्यापीठाने स्पष्ट केले.

कोरोनाच्या काळात अंतिम वर्ष परीक्षांचे नियोजन करताना, विद्यार्थ्यांना घरी बसूनच परीक्षा देता यावी, याबाबत राज्य सरकार तसेच राज्यपाल आग्रही होते. यानुसार सर्व विद्यापीठांनी नेमकी काय तयारी केली आहे याचा अहवाल सादर करण्याबाबतच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण संचालकांनी विद्यापीठांना केल्या होत्या. यासाठी सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली होती. यानुसार राज्यातील बहुतांश विद्यापीठांचे अहवाल संचालकांकडे जमा झाले. यात अंतिम वर्षाची परीक्षा ही तीन तासांऐवजी एक तासाची होईल. तसेच १०० गुणांऐवजी ५० गुणांची बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा विद्यालय स्थरावर होणार असून ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याचेही विद्यापीठांनी स्पष्ट केले. जे विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी कॉलेजमध्येच परीक्षा होतील. सर्व विद्यापीठांनी शासनाने दिलेल्या ३१ ऑक्टोबरपर्यंतच्या मुदतीत परीक्षा पूर्ण करण्याचे प्राथमिक नियोजन केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थी अभ्यासापासून दूर आहेत. त्यामुळे  सरावासाठी विद्यापीठांकडून ऑनलाईन मॉडेलचे प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहे.