निराश्रितांसाठी हेल्पिंग हॅण्ड ठरते आहे देवदूत; एका तासात मिळतो गरजूंना मदतीचा हात

घरात अठराविश्व दारिद्र्य असल्याने दोन वेळेची सांज भागत नाही, रस्त्यावर झोपून उपाशी राहावे लागते, अपघात झाला तर मदत मिळत नाही, शिक्षणाची मनात इच्छा असताना आर्थिक परिस्थिती नाही अशा निराश्रितासाठी हेल्पिंग हॅण्ड देवदूत ठरत आहे.

  धामणगाव रेल्वे (Dhamangaon Railway).  घरात अठराविश्व दारिद्र्य असल्याने दोन वेळेची सांज भागत नाही, रस्त्यावर झोपून उपाशी राहावे लागते, अपघात झाला तर मदत मिळत नाही, शिक्षणाची मनात इच्छा असताना आर्थिक परिस्थिती नाही अशा निराश्रितासाठी हेल्पिंग हॅण्ड देवदूत ठरत आहे. धामणगाव शहर हे विद्यानगरी बरोबरच अध्यात्मिक नगरी म्हणून ओळखले जाते.

  शहरातील काही नवयुवकांनी एकत्र येऊन हेल्पिंग हॅण्ड नावाचा ग्रुप एक वर्षापूर्वी तयार केला. या ग्रुपमधील सर्व उच्चशिक्षित व व्यावसायिक नवयुवक आहेत, मात्र ज्या समाजात आपण जन्म घेतला त्या समाजाचे ऋण फेडावे म्हणून हे नवयुवक तळमळीने सामाजिक कार्य करीत आहेत.

  असा मिळतो मदतीचा हात
  तालुक्यातील वृद्धाश्रमात गादी, चादर, वृद्धांना औषधी, गॅस कनेक्शन सोबतच अन्नधान्याची व्यवस्था या युवकांनी एका वर्षात केली. जळका पटाचे येथील दिव्यांग व्यक्तीची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी एक पाऊल पुढे टाकले, शहरातील निराधाराच्या घरी धान्य पोहोचवून देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था होत नाही त्यांना आर्थिक बळ देणे, असे एकापेक्षा एक अविरत कार्य या युवकांचे सुरू आहेत. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने उपचार देण्यासाठी हेल्पिंग हॅंण्डचा सदैव पुढाकार असतो.

  एका क्लिकवर होते रक्कम जमा
  धामणगाव गॅस अँड डोमेस्टिक अप्लायन्सेसचे संचालक निखिल भंसाली यांच्या माध्यमातून हा ग्रुप तयार करण्यात आला. यातील सर्व युवकांनी आपापल्या क्षेत्रात आगळी- वेगळी ओळख निर्माण केली आहे. कामाच्या व्याप्तीमुळे अनेकांची महिन्या दोन महिन्यांनी भेट जरी होत नसली तरी दर महिन्याला फोन पेद्वारे एका क्लिकवर ही रक्कम जमा होते आणि जमा झालेल्या रकमेतून ज्यांना मदत लागते त्यांना ती पुरविली जाते.

  या हेल्पिंग हॅण्डमध्ये आलोक पोळ, वैभव इंदानी, विक्रम बुधलानी, सुमित बोराखडे, सागर ठाकूर , निखिल भंसाली, अनुपम जैन, अमित चौधरी, प्रशांत वाणी, अमर साकुरे, गोविंद राठी, संदीप राऊत, मुकुंद मुंधडा, हितेश विहिरे, महेश पनपालिया, पीयूष मुंधडा, अखिलेश बुधवारे, भूषण कांडलकर, हेमंत हरोडे, अमोल तिनखडे, सोहेब कुरेशी, आशीष कुकडे, सुनेश भुसारी, श्रीकांत टाले, सचिन भोसले यांचा सहभाग आहे.