प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

अंजनगाव सुर्जी येथे वीजचोरी पकडण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. ही घटना अंजनगाव सुर्जीतील आलम चौकात सोमवारी घडली.

    अंजनगाव सुर्जी (Anjangaon Surji).  वीजचोरी पकडण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. ही घटना अंजनगाव सुर्जीतील आलम चौकात सोमवारी घडली. वीज कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून अंजनगाव सुर्जी पोलिसांनी वीज चोराविरुद्ध सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ करून मारहाण केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.

    अंजनगाव सुर्जी येथील वीज वितरण कंपनीचे पथक वीजचोरी पकडण्यासाठी आणि वीजबिल वसुलीसाठी आलम चौक परिसरात गेले होते. दरम्यान येथील वाजीदखान रियाज्जुल्ला खान याने घरातील मीटरमधून थेट वायर टाकून वीजचोरी केल्याचे वीज कर्मचाऱ्यांना आढळून आले. त्यावेळी चोरी सापडल्याचे पाहून वाजीदखानने पथकातील सहायक अभियंता संदीप गुजर व त्यांच्या सहकाऱ्याशी हुज्जत घातली.

    दरम्यान वाद विकोपाला जाऊन वाहिदखान याच्यासह चार इसमांनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच नीलेश बर्वे या कर्मचाऱ्याचा मोबाइल हिसकावून त्यांनी काढलेले व्हिडीओ व फोटो जबरदस्तीने डिलिट केले. या प्रकरणाची तक्रार सहायक अभियंता संदीप गुजर यांनी अंजनगाव सुर्जी पोलिसात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला.