आटलेले जलस्रोत आणि वणवा उठले वन्यप्राण्यांच्या जीवावर; वन्यप्राण्यांची दाहीदिशा भटकंती

उन्हाळ्यात जंगलात एकीकडे वणव्यांची तीव्रता जाणवत आहे. दुसरीकडे कोरडे झालेल्या जलस्रोतांमुळे वन्यप्राण्यांना दाहीदिशांनी भटकंती करावी लागत आहे. वन्यप्राणी मोठ्याप्रमाणात जंगलाबाहेर पडताना दिसत आहे.

    पोहरा बंदी (Pohra Bandi).  उन्हाळ्यात जंगलात एकीकडे वणव्यांची तीव्रता जाणवत आहे. दुसरीकडे कोरडे झालेल्या जलस्रोतांमुळे वन्यप्राण्यांना दाहीदिशांनी भटकंती करावी लागत आहे. वन्यप्राणी मोठ्याप्रमाणात जंगलाबाहेर पडताना दिसत आहे. सूर्य आग ओकू लागल्याने जंगलातील पाण्याची डबकी कोरडी पडली आहेत. पोहरा, चिरोडी, वडाळी, मालेगाव, चांदूर रेल्वे या वर्तुळातील जंगलालगत गाव परिसरात पहाटे व रात्रीच्या सुमारास वन्यप्राणी नागरिकांच्या दृष्टीस पडत आहेत.

    तीन ते चार दिवसांपूर्वी पोहरा गावातील जंगलालगत असलेले वळू माता प्रक्षेत्रात येथील कर्मचाऱ्यांना बिबट्या फिरताना दिसून आला. त्यांनी आरडाओरड करताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. बिबट शिरल्याची माहिती पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. येथील कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे.

    पुरेशा पाणवठ्यांची व्यवस्था हवी
    पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी वनविभागातर्फे सिमेंट पाणवठे, कृत्रिम पाणवठे, वनतळे यांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र यंदा वन्यप्राण्यांना सिमेंट पाण्याचा थोडा आधार आहे. पण तो पुरेसा नाही. कारण जंगलातील कृत्रिम पाणवठे वनतळे पूर्णपणे आटले आहे. वन्यप्राण्यांच्या ठिकाणानुसार पाणवठे असायला हवेत मात्र तशी व्यवस्था नाही. जंगलातील तळ्यांमध्ये दरवर्षी मुबलक पाणीसाठा राहत होता, ते पूर्णपणे कोरडे झाले असल्याने विदारक चित्र पाहायला मिळत आहे.