राजकीय प्रभाव सहन न झाल्याने बदनाम करण्याचे षडयंत्र; रामदास भोजने यांचे स्पष्टीकरण

परतवाडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांचा राजकीय प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्याने विरोधकांमध्ये पोटशूळ उठलेला आहे, त्यामुळेच त्यांचेवर जाणीवपूर्वक घोटाळ्याचे आरोप लावून बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

    परतवाडा (Paratwada ).  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बबलू देशमुख यांचा राजकीय प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्याने विरोधकांमध्ये पोटशूळ उठलेला आहे, त्यामुळेच त्यांचेवर जाणीवपूर्वक घोटाळ्याचे आरोप लावून बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, असे स्पष्टीकरण खुलासा रामदास भोजने यांनी केले आहे. बोदड सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष असलेले भोजने यांची जिल्हा बँकेवर नुकतीच प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

    भोजने पुढे म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँके मध्ये 700 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आल्याची आवई काही विरोधकांनी उठवली आहे. ही आवई म्हणजे आगामी निवडणुका लक्षात घेता जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे. आगामी काही दिवसातच बँकेच्या निवडणुक लागणार आहे. बँकेवर गत अनेक वर्षांपासून बबलू देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांचे वर्चस्व आहे. आगामी निवडणुकीमध्ये बबलू देशमुख यांची घोडदौड रोखण्यासाठी काही मंडळी आरोप-प्रत्यारोप करीत आहे.

    त्याचाच एक भाग म्हणून 700 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे पिल्लू विरोधकांनी सोडले आहे. मात्र बबलू देशमुख यांची स्वच्छ प्रतिमा लक्षात घेता जनता या आरोपावर अजिबात विश्वास ठेवत नाही. बबलू देशमुख यांच्या कार्यकाळात बँक यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. जेव्हा बँकेचा एनपीए वाढला होता तेव्हा बँक डबघाईस येण्याची चिन्हे दिसू लागली होती. मात्र बबलू देशमुख यांनी एनपीए कमी करून बँकेला सावरले. शेतकऱ्यांना कर्ज मिळावे म्हणून सातत्याने प्रयत्न केले. कर्मचाऱ्यांना शिस्त लावून बँकेला जनताभिमुख केले.

    शिक्षकांसाठी ओडीची व्यवस्था करून दिली. इतकेच नव्हे तर ओडीची मर्यादा 3 लाखापर्यंत वाढवून दिली. त्यामुळे जिल्ह्यात बँकेची लोकप्रियता वाढली. अशाप्रकारे ज्यांनी बँकेमध्ये पारदर्शक व समर्पण भावनेने काम केले त्यांचेवर आरोप करणे दुर्दैवी होय असेही रामदास भोजने म्हणाले. विरोधकांचे बिनबुडाचे आरोप कदापी सहन केले जाणार नाही असा स्पष्ट इशाराही भोजने यांनी दिला आहे.