प्रिय आई, मी गेल्यानंतर तु स्वत:ला सांभाळ…; दिपाली चव्हाण यांचे आईला भावनिक पत्र

आई सगळ्यात आधी मी घेतलेल्या निर्णयाबद्दल मी जितकी माफी मागेन तितकी कमीच आहे. पप्पा व पप्पु गेल्यानंतर गेल्यानंतर तु खंबीरपणे उभी राहुन घराची जबाबदारी पेलत आहेत.

  अमरावती (Amravati).  आई सगळ्यात आधी मी घेतलेल्या निर्णयाबद्दल मी जितकी माफी मागेन तितकी कमीच आहे. पप्पा व पप्पु गेल्यानंतर गेल्यानंतर तु खंबीरपणे उभी राहुन घराची जबाबदारी पेलत आहेत. ज्या वयात मी तुझी काळजी घ्यायला हवी, तिथे तुच मला सांभाळले आहेस. मी आल्याशिवाय जेवत नव्हती, मला त्रास नको, म्हणून तुझ दुखण माझ्यापासून लपवून ठेवायची. पप्पा असताना तु जशी होतीस, त्यापेक्षा आता आमच्यासाठी जास्तच खंबीरपणे उभी राहतेस.

  मी नोकरीला लागल्यापासून निदान तुझ्या औषधांचा खर्च तरी मी भागवणे गरजेचे होते. पण मला माझ्या ऑफीस खर्चातून तेवढ सुध्दा कधी जमल नाही. तुझे औषध संपले की आहे, हे पण मी कधी बघीतल नाही. मी इतकी कामात गुंतून गेले की तुझ्यासाठी वेळ काढता आला नाही, आई मला माफ कर, माझ्या चुकीसाठी मी तुझी माफी मागते, मी गेल्यानंतर तु स्व:ताला सांभाळ, असे भावनिक पत्र आरएफओ दिपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी आईसाठी लिहून ठेवले होते.

  या कुत्र्यांसाठी का सोडू नोकरी
  हरिसाल आल्यापासून मला माझ्या कामातून वेळ काढता आला नाही. मला शिवकुमार साहेब प्रत्येक वेळेस शिविगाळ करतात, सारखे ओरडतात. मी प्रत्येक वेळेस घरी सांगितले. तु म्हणतेस असु दे साहेब आहे. ओरडणारच, होईल सगळ ठिक, पण काहीच ठिक नाही झाल. मला खुप मानसिक त्रास होत आहे. त्या नालायक माणसाच्या त्रासामुळेच माझ अबॉऊशन पण झाल, पण तरी त्याने मला दोन दिवस आराम नाही करू दिला. मी खुप थकले आहे आता, मी नोकरी सोडायचा पण विचार केला, पण माझी नोकरी मी स्वत:च्या मेहनतीवर मिळवली आहे. या कुत्र्यासाठी का सोडू, मी नेहमी स्वत:ला समजवत राहीले. आता आपली बदली होणारच आहे, अजुन थोडे दिवस सहन करू, अशा शब्दात दिपालीने आपल्या आईला लिहिलेल्या पत्रात शिवकुमारविरोधात मत व्यक्त केले.

  उपकाराची परतफेक कशी करू?
  माझ तुमच्या सर्वांवर खुप प्रेम आहे. हरिसालला आल्यापासून तुमच्यासोबत कधी वेळच घालवायला मिळाला नाही. मला माफ करा, इशान, इरा, समिहन, राजविर, आत्या आणि भाऊची काळजी घ्या, आत्या, भाऊ, भारती, साजीद तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी खुप केलत, तुमचे संगळ्याचे खुप उपकार आहेत. माझ्यावर त्या उपकारांची परतफेक करण शक्य नाही. मी तुम्हाला सोडून जात आहे, असे दिपालीनी आपल्या नातलगांना पत्रातून म्हटले आहे.

  राजेशने दुसर लग्न केले तर मला आनंद होईल
  आईला लिहिलेल्या पत्रात दिलापीने तिचे पती राजेश यांना दुसरे लग्न करण्यास सांगितले आहे. आई माझ संगळ सामान साताऱ्याला घेऊन जा. राजेशसाठी माझी कुठलीच आठवण ठेऊ नको, त्याला त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात करू दे. त्याने दुसरे लग्न केले तर, मला आनंद होईल, माझ्या दुखा:त तुम्ही दुखी राहू नका. मला ते चांगल वाटणार नाही, आई माझ्या नोकरीतून काही पैसे मिळाले तर आपल्या घराचे हप्ते फेड, नाहीतर ते घर विकून छोटस तुझ्यापुरत घर घे, मला माफ कर, पप्पा आणि पप्पुनंतरदेखील मी तुझी जबाबदारी नाही घेऊ शकले, असे भावनात्मक मत दिपालीने व्यक्त केले.