orange farmer

जुलै-ऑगस्टमध्ये निसर्गाच्या प्रकोपामुळे संत्रा बागांमधील संत्राची फळगळ मोठ्या प्रमाणात झाली. उर्वरित संत्रा फळांची शेतकऱ्यांनी योग्य जपणूक करून त्यांना टिकून ठेवले. मात्र संत्राला भाव नसल्याने, संत्रा उत्पादक पुन्हा चिंतेत सापडले आहे.

चांदूर बाजार. जुलै-ऑगस्टमध्ये निसर्गाच्या प्रकोपामुळे संत्रा बागांमधील संत्राची फळगळ मोठ्या प्रमाणात झाली. उर्वरित संत्रा फळांची शेतकऱ्यांनी योग्य जपणूक करून त्यांना टिकून ठेवले. मात्र संत्राला भाव नसल्याने, संत्रा उत्पादक पुन्हा चिंतेत सापडले आहे.

संत्रा आंबिया बहराची फूट चांगली झाली होती. जुलै ते ऑगस्टमध्ये संत्रा बागायतीमध्ये मोठ्या प्रमाणात गळण झाली. या गळणमध्ये ३५ ते ५० टक्के संत्रा गळाला. आजच्या परिस्थितीमध्ये संत्रा कमी असतानासुद्धा १५०० ते २ हजार रुपयेच भाव असल्याचे सांगितल्या जात आहे. व्यापारीसुद्धा कमी  माल घेत असल्याने, संत्रा उत्पादक पुन्हा अडचणीत सापडला आहे.

लॉकडाऊनमुळे नुकसान
हा तालुका संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या या तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादन घेतले जाते. या भागात भरपूर पाणी असून पूर्णा नदीच्या दोन्ही काठावर संत्रा बागा मोठ्या प्रमाणात आहे. गेल्यावर्षी लॉकडाऊनमूळे वाहतूक बंद असल्याकारणाने संत्रा माल विकल्या गेला नाही. त्यामुळे उत्पादकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले. तालुक्यात घाटलाडकी, ब्राह्मणवाडा थडी, करजगाव, देऊरवाडा, काजळी, कोदोरी, माधान त्याचप्रमाणे सोनोरी, नानोरी, थूगाव पिंपरी या भागात मोठ्या प्रमाणात संत्रा भागांचे उत्पादन होते.

अतिवृष्टीचा फटका
यावर्षी आंबिया बहराचे चांगली फुट झाल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चांगले समाधान व्यक्त होत होते. पण तालुक्यात झालेल्या अतिपावसामुळे संत्रा फळांवर काळे व पिवळे डाग पडून संत्र्याची मोठ्या प्रमाणात गळण झाली. त्यात काही प्रमाणात संत्रा बागांमध्ये उरलेल्या संत्र्यालाही भाव नसल्याने संत्रा बागायतदार आर्थिक विवंचनेत सापडले आहे.

“ निसर्गाच्या कोपापासून कसाबसा वाचवलेला संत्रालाही भाव नसल्यामुळे, लावलेला खर्चसुद्धा निघेल की नाही, याची शाश्वती नाही.”

- प्रदीप बंड, संत्रा उत्पादक