bondali

अमरावती. दसरा, दिवाळी सणाला लागणारा खर्च तसेच रब्बीची पेरणी खरिपाच्या पिकावर अवलंबून असते. ते नुकसानीचे जरी ठरळे असले तरी आर्थिक नुकसान उराशी बाळगून शेतकऱ्यांनी आता रब्बी हंगामावर भिस्त ठेवली आहे. मात्र अशातच जिल्ह्यातील काही भागात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव (अटॅक) झाल्याने शेतकरी पुन्हा काळजीत सापडला आहे. खरिपामध्ये अतिवृष्टीने सोयाबीनचे एकरी उत्पादन पाच क्विंटलच्या वर गेले नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीनची एकरी उत्पादनाची मालिका शुन्यापासून सुरू झाली असून ती चार, पाचवरच थांबली.

यातही भाव वाढतील, अशी आशा दिसत असली तरी सोयाबीन घरी साठवून ठेवण्याची परिस्थिती नाही. बाजारात ४२०० रुपयांचा दर असला तरी १८०० रुपयांपासून खरेदी केली जात आहे. सरासरी भाव पाहिला तर हा ३ हजारावर स्थिरावत आहे. सध्या कापूस वेचणीला प्रारंभ झाला असून दिवाळी अगोदर शेतकऱ्यांच्या घरी पांढरे सोने असणार आहे. पण बोंडअळीने शिरकाव केल्याने हे पीक अधांतरी आले आहे. अशातच समोर असलेली रब्बीची पेरणी पाहता यासाठी लागणाऱ्या खर्चाला आर्थिक बळ आणावे कोठून, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.