बोट उलटल्याने नदी पात्रात ११ जण बुडाल्याची भीती; तिघांचे मृतदेह लागले हाती

एकाच कुटुंबातील 11 जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रियेच्या विधीसाठी आले होते. दशक्रियेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वरुडकडे फिरायला गेले.

  अमरावती (Amravati) : जिल्ह्यातील श्री क्षेत्र झुंज येथे एकाच कुटुंबातील 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बोट उलटल्याने वर्धा नदीपात्रात ११ जण बुडाल्याची माहिती आहे. तिघा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून इतरांचा शोध सुरु आहे.

  एकाच परिवरातील 11 जण दशक्रिया विधीसाठी आले होते. काल दशक्रिया विधी आटोपल्यानंतर आज फिरायला गेले असता ही दुर्घटना घडली. नाव उलटून तिघा जणांना जलसमाधी मिळाली, तर आठ जणांचा शोध सुरु आहे.

  नेमकं काय घडलं?
  अमरावती जिल्ह्यातील बेनोडा शहीद पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीत बोट उलटून 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून अद्याप तीन मृतदेह मिळाले आहेत.

  दशक्रिया विधीनंतर कुटुंबीयांचा विहार
  एकाच कुटुंबातील 11 जण गाडेगाव येथील मटरे कुटुंबीयांकडे दशक्रियेच्या विधीसाठी आले होते. दशक्रियेचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वरुडकडे फिरायला गेले. त्यावेळी महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून बोटीने जात होते.

  अचानक नाव उलटली आणि अकराही जण बुडाले. यामध्ये बहीण, भाऊ, जावई यांचा समावेश आहे. सर्वांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अद्याप तिघांचे मृतदेह हाती लागले असून यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. स्थानिकांच्या मदतीने इतरांचा शोध सुरू आहे.

  सापडलेले मृतदेह
  1. नारायण मटरे, वय 45 वर्ष, रा. गाडेगाव
  2. वांशिका शिवणकर, वय 2 वर्ष, रा. तिवसाघाट
  3. किरण खंडारे, वय 28 वर्ष, रा. लोणी

  नावेतील इतर प्रवासी
  1. अश्विनी खंडारे, रा. तारासावगा
  2. वृषाली वाघमारे, रा. तारासावंगा
  3. अतुल वाघमारे, रा. तारा सावंगा
  4. निशा मटरे, रा. गाडेगाव
  5. अदिती खंडारे, रा. तारा सावंगा
  6. मोहिनी खंडारे, रा. तारा सावंगा
  7. पियुष मटरे, रा. गाडेगाव
  8. पूनम शिवणकर, रा. तिवसाघाट