अमरावती जिल्हा बँक निवडणुकीला गालबोट, मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांमध्ये परस्पर हाणामारी

निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. आतषबाजीसुद्धा करण्यात आली. त्याठिकाणी तैनात पोलिसांनी कार्यकर्त्यांना तेथून जाण्यास सांगितले. त्यातच काही कार्यकर्त्यांमध्ये परस्पर हाणामारी सुरू झाली.

    अमरावती (Amravati) : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीला (amravati district bank election) मंगळवारी अखेर गालबोट लागले. मतमोजणी आटोपल्यानंतर काही उत्साही कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाला. मात्र, त्यानंतर हा वाद चिघळला व पोलिसांनी बळाचा (police force) वापर केला. त्यामुळे गाडगेबाबा समाधी मंदिर (the Gadge Baba Samadhi temple) परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता.

    जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी संत गाडगेबाबा समाधी मंदिर सभागृहात झाली. यावेळी मतमोजणीची प्रक्रिया शांततेने पार पडली. संपूर्ण मतदारसंघाचे निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. आतषबाजीसुद्धा करण्यात आली. त्याठिकाणी तैनात पोलिसांनी कार्यकर्त्यांना तेथून जाण्यास सांगितले. त्यातच काही कार्यकर्त्यांमध्ये परस्पर हाणामारी सुरू झाली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी बळाचा वापर केला.

    हे पाहून बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे त्याठिकाणी आले. काही वेळातच पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा केला. परिसरातील दुकानेसुद्धा बंद करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचासुद्धा प्रयत्न केला. पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे गाडगेनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी संपूर्ण परिसरात मार्च केला.