नवख्यांना संधी, आता नजर सरपंच पदावर

जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी हाती आले. अनअपेक्षीत निकाल लागल्याने काही ठिकाणी आनंद तर काही ठिकाणी दुखवट्याचे वातावरण होते. निकालानंतर बहुतांश ग्रामपंचायतींवर सत्तापरिवर्तन झाले असून वजनदार प्रस्थापितांना गावपुढार्यांना मतदारराजाने ‘धक्का’ दिला आहे. त्यामुळे आपोआपच नवख्यांना संधी मिळाली आहे. काही स्थानिक पातळीवर व तर काही राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या समर्थनाने बनलेले पॅनल विजयी झाल्याने पक्ष पदाधिकारी आपली सरशी असल्याचे दावे प्रतिदावे करत आहेत. निकालानंतर आता सर्वांची नजर सरपंच पदावर खिळली आहे. कारण निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यावरच निवडणुकीतील खरा ‘सिकंदर’ कोण ठरणार हे स्पष्ट होईल.

अमरावती (Amaravati).  जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायतींचे निकाल सोमवारी हाती आले. अनअपेक्षीत निकाल लागल्याने काही ठिकाणी आनंद तर काही ठिकाणी दुखवट्याचे वातावरण होते. निकालानंतर बहुतांश ग्रामपंचायतींवर सत्तापरिवर्तन झाले असून वजनदार प्रस्थापितांना गावपुढार्यांना मतदारराजाने ‘धक्का’ दिला आहे. त्यामुळे आपोआपच नवख्यांना संधी मिळाली आहे. काही स्थानिक पातळीवर व तर काही राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या समर्थनाने बनलेले पॅनल विजयी झाल्याने पक्ष पदाधिकारी आपली सरशी असल्याचे दावे प्रतिदावे करत आहेत. निकालानंतर आता सर्वांची नजर सरपंच पदावर खिळली आहे. कारण निवडणुकीनंतर सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यावरच निवडणुकीतील खरा ‘सिकंदर’ कोण ठरणार हे स्पष्ट होईल.

गाव पुढाऱ्यांचा धुरळा
जिल्ह्यात अनेक ठिकाणी अस्सल राजकारणी गावपुढार्यांचे अख्खे पॅनलच कोसळले आहे. त्यामुळे गावात वट असलेल्या या गावपुढार्यांना जबर धुरळा उडाला आहे. ज्यामध्ये नया अकोला येथील शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख शाम देशमुख यांच्यासह त्यांचे अख्खे पॅनल कोसळले. त्यांना गावातील अत्यंत सामान्य कुटूंबातील गैरराजकिय व पानटपरीचा व्यवसाय करणारे आशिष घोरमाडे यांनी पराभूत केले. वरुड तालक्यातील राजुरा बाजार येथील पंचायत समिती सदस्य सिंधु करनाके यांना ग्रामपंचायत निवडणुकीत पराजय पत्कारावा लागला. पुसला येथे जिल्हा परिषद सदस्यांची पत्नी रेखा पाटील पराभूत झाल्या. त्याप्रमाणे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सतिश हाडोळे यांच्यासह संपुर्ण पॅनल, भाजपचे अंजनगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर दाळु, माजी पंचायत समिती सभापती व शिवसेनेचे अमरावती तालुका प्रमुख आशिष धर्माळे यांना चांगलेच तोंडघशी पडावे लागले.

१५ ठिकाणी फेरमोजणी
जिल्ह्यातील 14 तालुक्यात 537 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी विविध तालुक्यातील मतमोजणी केंद्रावर सुरळीत व शांततेत पार पडली, अशी माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली. सकाळी 10 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीदरम्यान फेरमतमोजणी करण्याबाबत जिल्ह्यात एकूण 15 अर्ज प्राप्त झाले होते. त्यात धामणगाव तालुक्यातून पाच, वरूडमधून चार, अंजनगाव सुर्जी तालुक्यातून तीन व अचलपूर, चांदूर बाजार आणि भातकुली तालुक्यातून प्रत्येकी 1 याप्रमाणे अर्ज प्राप्त झाले. त्यानुसार 15 ठिकाणी फेरमतमोजणी झाली व निकाल जाहीर झाला, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा पवार यांनी दिली.

३४१ ग्रामपंचायतींवर काँग्रेस
ग्रामपंचायतीचा निकाल सोमवारी घोषित करण्यात आला यामध्ये काँग्रेसने ग्रामीण भागात आपले वर्चस्व प्रस्थापित करीत 553 पैकी 341 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकविल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. अमरावती तालुक्यात 44 पैकी 20 काँग्रेस , भातकुली तालुक्यात 35 पैकी 21 काँग्रेस, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 47 पैकी 30 काँग्रेस, दर्यापूर तालुक्यात 50 पैकी 35 काँग्रेस, अंजनगाव सुर्जी तालुक्यात 34 पैकी 25 काँग्रेस, तिवसा तालुक्यात 28 पैकी 23 काँग्रेस, चांदुर रेल्वे तालुक्यात 29 पैकी 17 काँग्रेस, धामणगाव रेल्वे तालुक्यातील 53 पैकी 31 काँग्रेस, अचलपूर तालुक्यात 44 पैकी 27 काँग्रेस, चांदूरबाजार तालुक्यात 41 पैकी 28 काँग्रेस, मोर्शी तालुक्यात एकूण 40 पैकी 25 काँग्रेस, वरुड तालुक्यात 41 पैकी 30 काँग्रेस, धारणी तालुक्यात 34 पैकी 14 काँग्रेस, चिखलदरा तालुक्यात 23 पैकी 15 काँग्रेस, अशा 341 ग्रामपंचायतीवर जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

काँग्रेसचाच बोलबाला-देशमुख
जिल्हा परिषद अध्यक्ष व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले की, माझ्या स्वगृही चांदूर बाजार मतदारसंघातील 95 टक्के ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. तसेच जिल्ह्यात बरेच ठिकाणी कॉंग्रेसचाच बोलबाला आहे. हा केंद्र सरकारच्या विरोधातील राग असून ही जनतेची भाजपमुक्तीकडे वाटचाल असल्याचे बबलु देशमुख यांनी सांगितले.

तिवसा मतदारसंघात काँग्रेस
तिवसा मतदारसंघातील ग्रामपंचायत निकालात पालकमंत्री यशोमती ठाकुर यांच्या नेतृत्वाला मतदारांनी कौल दिला असल्याचा दावा त्यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे. गुरुकुंज मोझरी येथील ग्रामपंचायत निवडणूकीत एकुण तेरा सदस्यांसाठी 42 उमेदवारांनी आपले भाग्य आजमावले. त्यात काँग्रेस पक्षाचे ग्रामविकास पॅनलचे सात उमेदवार बहुमताने निवडून आले आहेत. त्याचप्रमाणे, नजीकच्या गुरुदेव नगर ग्रामपंचायतीमध्ये एकुण 11 जागांसाठी 32 उमेदवारांनी निवडणूक लढवली असून यामध्ये काँग्रेस पक्षाचे आठ उमेदवार निवडून आले आहेत. त्याचप्रमाणे लगतच्या शेंदोळा ग्रामपंचायतीमध्येही काँग्रेस पक्षानेच बाजी मारली असून नऊपैकी आठ जागा काँग्रेसप्रणित ग्रामविकास पॅनलला मिळाल्या आहेत. एकंदरितचग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला अभेद्य राखण्यात काँग्रेसला यश आले असल्याचा दावा केला जात आहे.

या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे मन:पूर्वक अभिनंदन. जे विजयी झालेले आहे ते आपलेच कार्यकर्ते आहेत तसेच ज्यांना पराभवाचा सामना करावा लागला ते सुद्धा आपलेच कार्यकर्ते आहे. सर्वांनी आपसी मतभेद विसरुन पुन्हा एकदा आपल्या गावाच्या सर्वांगीण विकासाकरिता एकत्र येऊन काम करावे. — Adv. यशोमती ठाकुर, पालकमंत्री, अमरावती.

भातकुली तालुक्यात शिवसेनेची सरशी
अमरावती. ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेना व युवा स्वाभिमानी पक्षात काट्याची टक्कर झाल्यानंतर 31 पैकी 17 ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळविल्याचा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल खराटे यांनी केला आहे.

मोर्शी-वरुडात भाजपाचे वर्चस्व- माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा दावा
मोर्शी. वरूड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे वर्चस्व असल्याचा दावा माजी पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. मोर्शी तालुक्यात 39 ग्रामपंचायतीत 24 ग्रामपंचायतीवर भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. केवळ 5 ते 6 ग्रामपंचायतीत 1, 2 सदस्यांची आवश्यकता पडणार आहे. 351 जागांपैकी एकूण 183 भाजपा उमेदवार विजयी झाले. नशीबपूर, इतमगाव, धनोडी येथे एकतर्फी विजय मिळविला. त्याचप्रमाणे वरूड तालुक्यात चांदस वाठोडा, ढगा, झटामझिरी येथे भाजपाने बाजी मारली.

निष्क्रीय आमदाराप्रति रोष
महाविकास आघाडी सरकार प्रती ग्रामीणसह संपूर्ण विदर्भावर दुर्लक्ष होत आहे. कोरोना काळात वीज बिलावरून यूटर्न घेतला. संपूर्ण कर्जमाफी दिली नाही. अकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत दिली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला मतदारांनी नाकारले आहे. मोर्शी-वरूड तालुक्यात निष्क्रीय आमदार मिळाला आहे. त्यामुळे भाजपच विकास करु शकत असल्याचे मतदारांनी मान्य केले आहे. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर देखील भाजपाला विजय मिळाला आहे.

भाजपाला घवघवीत यश
जिल्ह्याच्या सर्वच भागात भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. एकूण ग्रामपंचायतींपैकी 175 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर भाजपने कब्जा केला आहे. ग्रामीण मतदारांनी दिलेला निकाल हा महाविकास आघाडीच्या विरोधात आहे.
— निवेदिता चौधरी, भाजपा जिल्हाध्यक्ष

राष्ट्रवादीची मते वाढली
महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत होता. अनेक ठिकाणी पक्षाने महाविकास आघाडीसोबत एकत्र लढविली. निवडणुकीच्या निकालात देखील महाविकास आघाडीने यश प्राप्त केले आहे. सोबतच राष्ट्रवादीने देखील मागील निवडणुकीच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे. — सुनील वर्ऱ्हाडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष